१.
कैक पक्षी गावात गात होते
दिवस तेव्हाचे छान जात होते
गीत कविता पाऊस ऊन वारे
सर्व हृदयी अन् श्रावणात होते
काल पैसा माझ्या खिशात होता
काल माझ्या हातात हात होते
आज झाले आहेत धूर्त कोल्हे
लोक आधीचे माणसात होते
बसत होता घेऊन एक पुस्तक
ग्रंथ उरलेले धूळ खात होते
लाखवेळा मी पाहिले असावे
विश्व सुंदरसे आरशात होते
सुचत नव्हते तेव्हा खरेच काही
रुसुन बसले मन कोपऱ्यात होते
२.
काढून वेळ थोडा नक्की तपास मित्रा
मिळणार खूप काही हृदयात खास मित्रा
सोडून हात आई लवकर निघून गेली
झाला म्हणून पुढचा खडतर प्रवास मित्रा
ज्यांनी उगाच केली कत्तल इथे तरूंची
त्यांना म्हणे फुलांचे छळतात भास मित्रा
आता खरी परीक्षा आयुष्य घेत आहे
कॉपी करून झालो शाळेत पास मित्रा
आयुष्य लाभलेले जगणार छान आहे
घेणार रोज नाही नुसताच श्वास मित्रा
३.
धावत्या जगात आज थांबुनी बघा
काळजामधील हाक ऐकुनी बघा
भेटल्या क्षणीच सर्व दुःख संपते
मायबाप विठ्ठलास भेटुनी बघा
रात्रभर अखंड दीप तेवतो जसा
एकदा तशीच रात्र जागुनी बघा
मंदिरात जायला नसेल वेळ तर
माणसांमधेच देव शोधुनी बघा
झोपड्यांमधेच रोज राहता तरी
बंगले मनामनात बांधुनी बघा
सर्व सोडुनी जनावरे मनातली
फक्त आत माणसास पाळुनी बघा
................................. अभिषेक बोरगावकर
नृसिंहवाडी,
जिल्हा कोल्हापूर
खूप सुंदर...तिन्ही गजलांचे मतले अतिशय आवडले...वाह वाह
ReplyDelete