१.
तुझिया शब्दांपुढती अजुनी मला वाकणे आहे
तुझ्याच हाताखाली तेथे मला नांदणे आहे
उभारतो मी जरी मनोरे आभाळा भिडणारे
तरी धरेच्या मातीमध्ये
नित्य रांगणे आहे
सभोवताली पराभवांच्या दाटुन येता राती
विजयसूर्य तो बघण्यासाठी मला जागणे आहे
त्रागा करुनी कधी तिथे का इच्छित सारे मिळते?
भाग्यवेळ ती येइल केव्हा?वाट पाहणे आहे
मी लिहिताना केवळ असते एकच धडपड माझी
गझल गुरूंचे नाव जीवनी तिथे राखणे आहे!
पायांमधली शक्ती जाता मना उभारी आली
अता मनाच्या वेगाने
मज पुढे धावणे आहे
हुलकावत मज गझल धावते समोर ज्या मार्गाने
त्या वाटेवर मजसी अंती प्राण सोडणे आहे
२.
ते सताड उघडे दार घराचे माझ्या
पण दूर थांबती यार घराचे माझ्या
मम खांदे कणखर तरी कसे मी पेलू?
मज असह्य होती भार घराचे माझ्या
सारेच उन्हाळे त्याच्या नशिबी येती
मग सुकते तोरण,हार
घराचे माझ्या
देशात तिथे दंगली भडकती जेव्हा
घडतात त्यात संहार घराचे माझ्या
कित्येक पिढ्यांची ये,जा तेथे होते
सजतात नवे संसार घराचे माझ्या
ते कालचक्र वेगाने फिरते आहे
राहती अचल आकार घराचे माझ्या
संगीत जोवरी नात्यांमध्ये आहे
श्रवणात नाद झंकार घराचे माझ्या.
३.
आयुष्याने माझ्यासंगे लपवाछपवी केली
कधी सुखांची,कधी व्यथांची पळवापळवी केली
नजर लावुनी वाट पाहिली तुझी गडे मी तेथे
चाहुल देउन तव छायेने फसवाफसवी केली
लिहू वाटले म्हणून हाती कलम घेतले जेव्हा
शब्दार्थांनी अशी कशी ती बनवाबनवी केली?
किती प्रेरणास्थाने माझ्या हृदयामध्ये होती
माझ्या नकळत कुणी तयांची हलवाहलवी केली?
किती प्रश्न मी आयुष्याला नित्य विचारत होतो
उत्तर नाही दिले तयाने उडवाउडवी केली
शिखर यशाचे समीप आले असे वाटले मजला
वळणावळणाच्या रस्त्याने चकवाचकवी केली
डोळ्यांमधल्या अश्रूंना मी गाली वाळवले अन्
ओढुनताणुन मग मी थोडी हसवाहसवी केली!
छान!,
ReplyDeleteसुंदर.
ReplyDeleteखूप सुंदर गज़ल
ReplyDelete