१.
मानभावी बोलावणी तुझी
जीवघेणी हुलकावणी तुझी.
तो म्हणाला, घरमालकीण तू
घरच होते, की दावणी तुझी?
घुंगरांमधली भूक ऐकली,
ऐकवेना मग लावणी तुझी.
झोंब देतांना माय उमगते,
मानली मी समजावणी तुझी.
ओठ, डोळे सरसावले पुढे
जिंकली मग मी छावणी तुझी.
२.
अवघी दुनिया काजळमाया
पायी चकवा,भूल पडाया.
मृगजळ कोठे येते हाती?
सारा जन्मच जातो वाया.
अत्तर असते मौन बिचारे
रूबाबातच असतो फाया.
झाला का मग तृप्त ययाती?
रोजच पुसते माझी काया.
शंकेच्या घुबडाला दिसते
भिंतीवरची फसवी छाया.
सैलानी तो घुमतो आहे
दिङ्मूढ अता झाल्या बाया.
कोणी केला जादूटोणा?
हा कोणाचा मजवर साया?
३.
आयुष्यावर सावट आहे
दु:खाचा हा भयपट आहे.
दस्तक देते दारावरती
इच्छा भलती उत्कट आहे.
प्रेमच भिनते विष होवोनी
चव न्यारी ती गुळचट आहे.
फक्त रुपाला किंमत नाही
मेंदू जर तो बुरसट आहे.
कणसे खुडली मोहाची पण
पायी रुतले धसकट आहे.
सातमहाली हसतो तो पण
आत किती ती घुसमट आहे.
अर्ध्यावर ही कोसळते बघ
जीवन नुसती खटपट आहे.
एकवेना मग लावणी तुझी.. बढिया
ReplyDelete