तीन गझला : महेन महाजन


१.

एक हक्काचा मिळू दे उंबरा माझा मला
आसऱ्याला फक्त दे तू कोपरा माझा मला

या जगाशी लढत जगलो रोज मी बेवारशी
भेटला नाही कुठेही आसरा माझा मला

आरश्याशी प्रीत ना जुळली कधी ही फारशी
रोज दिसतो टाळताना चेहरा माझा मला

पंख आहे,जोर आहे, दारही आहे खुले
का तरीही आवडे हा पिंजरा माझा मला

छान झाले हे,किनारी नाव तुमची लागली
गोल फिरवत बैसला हा भोवरा माझा मला

मुखवट्यांनी जिंकली ही शेकडो सिंहासने
ही बरी माझी फकीरी,'मी' बरा माझा मला

२.

कधी मी टाळल्या गेलो कधी हेटाळल्या गेलो
फुलांतुन चालतानाही कधी रक्ताळल्या गेलो

उजेडाने घरे न्हाली फुकाने कोणती सांगा ?
इथे प्रत्येक जागी मी नव्याने जाळल्या गेलो

अशा सुकुमार पुतळ्यांनी अडवली वाट ही माझी
खुल्या रस्त्यात सुद्धा मी पुरा ठेचाळल्या गेलो

तिच्या नंतर फुलांचीही किती आमंत्रणे आली
शपथ आहे कधी मी जर कुणावर भाळल्या गेलो

सुगंधाशी जिचे नाते कधी जुळले जरी नाही
तिच्या केसांत जीवनभर सुखाने माळल्या गेलो

नकोसे भोगही माझ्या असे आलेत वाट्याला
जिथे कुरवाळल्या गेलो, तिथे चुरगाळल्या गेलो !

३.

नागड्या दुनियेपुढे मी सत्य मांडत राहिलो
आंधळ्या न्यायालयाला न्याय मागत राहिलो

मी खरा होतो तरीही मानले नाही कुणी
मग पुराव्या वाचुनी मी फक्त बोलत राहिलो

मी चुकीच्या पद्धतीने मांडले होते खरे
जन्मभर मग त्या खऱ्याची हाय सोसत राहिलो

यापुढे मी वागणे बदलेन नक्की ठरवले..
लाखदा माझ्या मनाशी हेच ठरवत राहिलो

काय शिकला तू महेंद्रा आजच्या घटनेतुनी.?
प्रश्न साधा हा स्वतःला मी विचारत राहिलो

.................................
महेन महाजन
आंजी मोठी) वर्धा
9730962901

No comments:

Post a Comment