१.
वागणे तो असे बेकदर ठेवतो
दूर राहून माझी खबर ठेवतो
आणतो ना कधी शब्द ओठावरी
बोलकी फक्त त्याची नजर ठेवतो
प्रेम म्हणजे गुलाबी जणू एक विष
तू कशाला पुढे हे जहर ठेवतो ?
होय नाहीच त्याचे सदा चालते
शक्यता भेटण्याची धुसर ठेवतो
सांग कळती कशा हालचाली तुला
काय माझ्यावरी तू नजर ठेवतो ?
विसर देवा तुझा ना पडावा मला
पापणी तू म्हणुन ओलसर ठेवतो
२.
हात तू हातात क्षणभर घेतला असतास तर
एकदा जाण्याअगोदर भेटला असतास तर
घेतली माघार मी नाते जपाया लाखदा
तू इगो बाजूस थोडा फेकला असतास तर
वाटला असताच देवा चांगला तूही मला
तू कधी नवसास माझ्या पावला असतास तर
टाकले तोडून तू अन संपली माझी भिती
की, पुन्हा तू काळजाशी खेळला असतास तर
त्रास मग झालाच असता दूर जाण्याचा तुला
जीव तू माझ्याप्रमाणे लावला असतास तर
दाटुनी अंधार इतका राहिला नसता इथे
कंदिला वेळेवरी तू पेटला असतास तर
मांडली नसतीच मी माझी व्यथा गझलेतुनी
तू मला पर्याय दुसरा ठेवला असतास तर
दूर राहून माझी खबर ठेवतो...
ReplyDelete👌👌👌
दोन्ही गझला उत्तम अनिताई!
ReplyDeleteमतला नजर व्वाह! शेवटचे शेरही फार सुंदर
दोन्ही गझल उत्तम
ReplyDeleteकंदिलाचा शेर विशेष आवडला