१.
दुःखे तऱ्हेतऱ्हेची वाढून रीतसर
तो सांगतोय मजला की जेव पोटभर
कापून जीभ माझी फर्मावले मला
आता मनाप्रमाणे बिनधोक प्रश्न कर
ताटातुटीस अमुच्या युग लोटले तरी
नजरेतुनी छवी ती गेली न आजवर
आहेत जर घरातच ग्रंथालये जिती
तू टाक सुरकुत्यांवर त्यांच्या कधी नजर
सागर जरी हजारो आलेत आडवे
अपुली तहान आम्ही जपली हयातभर
उंची जरा कळूदे आम्हा तुझी खरी
गंजीवरुन शवांच्या खाली जरा उतर
२.
आधी व्यथेस अपुल्या प्रेमात पाडतो मी
पेल्यामधे तिला मग बुडवून टाकतो मी
प्रेमी विफल भलेही मरणे कमाल समजो
असली कमाल त्यांचे जगणेच मानतो मी
दरसाल माय गावी बोलावते परंतू
मारून थाप जाणे दरसाल टाळतो मी
लब्बाड जिंदगानी पिच्छा करीत आहे
मित्रा म्हणून इतक्या वेगात धावतो मी
नंदनवने स्वतःची देऊन दान आता
बाभुळवनास छाया भिक्षेत मागतो मी
क्षणभर उजेड येतो डोळ्यांमधे अधू या
अलबम जुनाट जेव्हा दररोज चाळतो मी
ऐकू जरूर येइल दुनिये तुला उद्या ते
मौनामधून अपुल्या जे आज सांगतो मी
३.
वार्धक्य हे काही अम्हा फुकटात नाही लाभले
तारुण्य त्यासाठी अम्ही साक्षात आहे जाळले
हिसकावल्या डोळ्यातल्या ज्योती अगोदर आमच्या
नंतर कुठे मग आरशा पुढती अम्हाला आणले
शोकेसच्या वस्तू मला दररोज हाका द्यायच्या
कंटाळुनी मी शेवटी जाणेच तिकडुन टाळले
क्षणभर हसूची मोजली किंमत अशी भरपूर की
आयुष्यभर मग सारखे मजला रडावे लागले
लाटच कधी नेइल तटी आशेवरी या शेवटी
तारू प्रवाहाच्या अम्ही स्वाधीन केले आपले
सांगायला तैनात होतो रक्षिण्या साठी दिवे
आदेश सारे मात्र मी कायम हवेचे पाळले
................................
मसूद पटेल ९६०४६५३३२२
No comments:
Post a Comment