१.
दुराव्याचा विदारक क्षण नको आहे मला आता
तुझ्या माझ्या मधे कुंपण नको आहे मला आता
दुरुन दिसते किती हिरवळ कुठे येणार वाट्याला
असा चित्रामधे श्रावण नको आहे मला आता
मुरड घालायची नाही मला किंचित तशी आता
रुढींचे बोचरे सारण नको आहे मला आता
असे पोटामधे दुसरे,दिसे ओठावरी दुसरे
दुटप्पी एवढे धोरण नको आहे मला आता
मनाला भावल्यानंतर विचारांचा तुझ्या सागर
जलाचा स्त्रोत साधारण नको आहे मला आता
२.
कधी पर्वा तिने केलीच नव्हती वादळाची
गडावर पाहिली आहे अशी झुंजार माची
नका ना वाकवू इतकी तुम्ही समजुन कण्हेरी
बघा तुटली अता नाजूक फांदी मोगऱ्याची
कधी बगळ्यास माझ्या भेटला जर धूर्त कोल्हा
लहर येते मला तेव्हा हिशोबी वागण्याची
अताशा शक्यता आहे झऱ्याच्या आटण्याची
जलावर सावली पडली म्हणे आहे उन्हाची
असा काठावरुन अंदाज नसतो येत त्याचा
जरा पोहून कळते नेमकी खोली तळ्याची
३.
सूर्यास वेदनेच्या झाकून ठेवले
थोडे मुठीत माझ्या मी ऊन ठेवले
काही झरे जलाचे अडवून ठेवले
ओले तळे मनाचे आतून ठेवले
कित्येकदा स्वतःला केलेय शांत मी
तू मूल आतमधले रडवून ठेवले
केलेस युद्ध जरिही चालेल जीवना
कौशल्य रणनितीचे आखून ठेवले
होणार झाड नक्की त्याचे कधीतरी
नुकतेच बी श्रमाचे रुजवून ठेवले
आतील काजळीला करणार स्वच्छ मी
आता दिवे स्वतःचे उजळून ठेवले
नसतो मरूभुमीवर बरसून फायदा
तेव्हा जरा सरींना रोखून ठेवले
खुप छान आहेत तीन्ही गज़ला... अभिनंदन....!
ReplyDelete