१.
थांबलो आहे सरळ रेषेत केव्हाचा
लागतो पाहू कुणाला वेध ग्रहणाचा
छानसा काळोख त्याने ठेवला मागे
साफ वाया जात नाही अस्त कोणाचा
फक्त चमकत राहिला पसरून पाण्यावर
एकरुप झालाच नाही थेंब तेलाचा
जेवलो आहे युगांच्या बारशाला मी
पोरगा आहेस तू तर कालपरवाचा
या मुहूर्तावर तुला जे घ्यायचे ते घे
रोज मग येणार आहे योग देण्याचा
ठाम असतो एवढा मी त्याच जागेवर
एकटा आहे जणू आधार विश्वाचा
जाळते आधी विषाची ऊब हृदयाला
मग शिवाला भेटतो कैलास बर्फाचा
२.
सरत्या वयात कळले आयुष्य काय आहे
पंढरपुरात कळले आयुष्य काय आहे
आयुष्य काय आहे कळण्यात जन्म गेला
एका क्षणात कळले आयुष्य काय आहे
रेखीव जीवनाची व्याख्या विरून गेली
रानावनात कळले आयुष्य काय आहे
नव्हते खरे कधीही जे मानले खरे मी
खोट्या जगात कळले आयुष्य काय आहे
खिडकीमधून आले जेव्हा तुषार काही
भर पावसात कळले आयुष्य काय आहे
अस्तित्व राखण्याचे मिटतील प्रश्न सगळे
जर उत्तरात कळले आयुष्य काय आहे
साधीसुधी गझल तो नाही म्हणत शिवाची
ज्याला तिच्यात कळले आयुष्य काय आहे
३.
इथे जी संचिताची साठवण आहे
तिच्यावर पारदर्शक आवरण आहे
उन्हे दिसताच ते बसणार गवतावर
धुके म्हणजे दवाचे बालपण आहे
दिसत नाही जगाला पण खुपत असतो
कुण्या डोळ्यातला मी धूलिकण आहे
इथेही चांगला जगशील निवडुंगा
इथेही कोरडे वातावरण आहे
तिलाही आठवत असतील त्या गोष्टी
खरेतर ही मनाची बोळवण आहे
मला वाटेल तेव्हा साजरा करतो
तुला चोरून बघणे एक सण आहे
शिवाला माहिती नाही असे नाही
तुझ्या असण्यामुळे हे देवपण आहे
वाह, सर, अप्रतिम गझला
ReplyDeleteवाह सर! अप्रतिम गझल 💐
ReplyDeleteक्या बात है भाऊ..तिन्ही गझला अफलातून
ReplyDeleteसुंदर
ReplyDelete