कोरोनाचे संकट जरी धूसर झाले असले तरी परत कधी मान वर काढेल या अनामिक भीतीने आपण जगायला शिकलो आहोत. टाळेबंदीच्या काळात हातात आलेला मोबाईल पूर्णतः सुटलेला नाही. जनजीवन पूर्वपदावर येत आहे. उत्सव आणि सोहळ्यातून उल्हास ओसंडून वाहतो आहे. टाळेबंदी दरम्यान फेसबुक आणि WhatsApp वर उत्साहात कार्यशाळा घेणारे आता दिसेनासे झालेत. नव्या दमाने पूर्वी प्रमाणेच ऑफलाईन मुशायरे होत आहेत. या दरम्यान अचानक सक्रिय झालेली साहित्यिकांची पिढी पुन्हा दैनंदिन व्यापात गुरफटून गेलेली दिसते. सोशल मीडियावरचे त्यांचे विहरणे कमी झालेले जाणवते. तर काहींनी मात्र घेतलेला वसा अजून जपला आहे. उत्तम गझला लिहिताहेत. गझलेसारख्या तंत्रशुद्ध काव्यप्रकारात तरुण पिढी रमते आहे. ही बाब मराठी गझलेचे उज्ज्वल भविष्य अधोरेखित करणारी आहे. याचा मनस्वी आनंद होतो आहे.
गझलेचे तंत्र सांभाळून व्यक्त होणे एवढेही सोपे नाही; पण आपल्याकडे काव्यप्रतिभा, अभ्यास आणि जीवनानुभव गाठीशी असेल तर कठीणही नाही. गझलेच्या तंत्राचे बारकावे समजून घेण्यासाठी आवश्यकता भासते ते एखाद्या तज्ज्ञ, अभ्यासू मार्गदर्शकाची. आणि बहुतेकांची येथेच गोची होते. कवी स्वतः शिकत शिकत कधी मार्गदर्शक बनतो आणि त्याचे अभ्यास करणे थांबते हे त्यालाही कळत नाही. काही मार्गदर्शक तर स्वयंभू असतात. त्यांचा कोणीच गुरु नसतो. पण ते इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी कायम तत्पर असतात. मार्गदर्शन करण्याची एकही संधी न चुकवता काही अफलातून संकल्पनांना शब्दरूप देऊन त्या शब्दावलीच्या व्याख्या मांडण्याचा प्रयत्न करताना दिसतात. उदा. गझलीयत, शेरीयत आदि. खरे तर अशा शब्दावली तयार करत बसण्यापेक्षा गझल हाही एक काव्यप्रकार आहे हे स्वीकारून उत्तम काव्यमूल्य गझलेत कसे आणता येईल यावर विचार करणे गरजेचे आहे.
उर्दू साहित्य आणि छंदशास्त्रात गझलीयत-शेरीयत संकल्पनेसाठी मूळ शब्द आहे तग़ज़्ज़ुल. उस्ताद ख्वाब अकबराबादी यांनी त्याला ‘तग़ज़्ज़ुल’ संबोधले आहे. तग़ज़्ज़ुल म्हणजे शेरातील प्रतिमांच्या समीकरणांची भावनानिष्ठ समतानतेने मांडणी ज्यामुळे शेरामधील आशयसौंदर्य अधिक खुलेल. वाचणाऱ्याला चमत्कृती वाटावी इतके नावीन्य त्यात हवे. पण ही चमत्कृती अमूर्त चित्रकलेसारखी धूसर असता कामा नये. तशी ती धूसर असली तर तिचा वाचकाशी भाषेच्या माध्यमाने संवाद होऊ शकणार नाही.
तांत्रिकदृष्ट्या शेर कितीही बरोबर असला तरी त्यात वरील प्रकारचा तग़ज़्ज़ुल नसेल तर तो सपाट ठरतो. ख्वाब अकबराबादी यांनी तग़ज़्ज़ुलचे तीन प्रकार सांगितले -
१- क़दीमी तग़ज़्ज़ुल – रिवायती / पारंपरिक
२- जदीदी तग़ज़्ज़ुल - तरक्की पसंद / आधुनिक
३- फ़िक्री तग़ज़्ज़ुल - तात्विक /
चिंतनशील
उर्दू गझलही सुरुवातीच्या काळात क़दीमी तग़ज़्ज़ुलने ओतप्रोत होती. प्रेयसी, प्रेमाच्या विळख्यात अडकली होती. कालांतराने त्यातून ती बाहेर पडली आणि जदीदी तग़ज़्ज़ुलकडे वळली. गझलेमध्ये जदीदी तग़ज़्ज़ुलच्या प्रवेशामुळे भाषा आणि आशयमांडणीतही बदल झाले. या परिस्थितीत उर्दू शायरांनी तग़ज़्ज़ुलशी तडजोड न करता अरबी, फारसी आणि उर्दू व्यतिरिक्त बोलल्या जाणार्या प्रांतीय भाषा आत्मसात केल्या. प्रांतीय भाषा आणि बोलीभाषेतील शब्दांना घेऊन ते गझल निर्मिती करू लागले. प्रांतीय भाषेसोबतच प्रांतीय तत्त्वज्ञान आले. तेही फ़िक्री तग़ज़्ज़ुल मधून व्यक्त होऊ लागले. जदीदी गझलेच्या पार्श्वभूमीवर उर्दू भाषाशास्त्र व स्वरशास्त्र जसेच्या तसे वापरणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यात सवलतींचा शिरकाव झाला. पण आज सवलती घेऊनही उत्तम तग़ज़्ज़ुल असलेल्या गझला लिहिल्या जात आहेत .जे गझलेवर प्रेम करतात ते अभ्यास आणि गरजेनुसार स्वतःला अद्ययावत ठेवत असतात. पण जे असे करत नाहीत, ते ‘तीच-ती पुनरावृत्ती’ करण्याच्या आहारी जातात. म्हणूनच उत्तम शेर वा गझल लिहिण्यासाठी तंत्रासोबतचआशयनिष्ठ तग़ज़्ज़ुल महत्त्वाचा आहे.
काव्य /शायरी म्हणजे काय असते तर मानवी सुख, दु:ख, प्रेम, अनुभव, गरज, भाव, भावना, विचार, लाचारी, वेदना, आदींना शब्दरुपाने अभिव्यक्त करणारी व्यवस्था आहे. तरीपण तथाकथित अभ्यासक, समीक्षक, टीकाकार त्यावर आपले मत नोंदवून तिला उत्तम किंवा दुय्यम ठरवत असतात. शेवटी हा उपद्व्यापही तौलनिक अभ्यासातून आलेला असतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे-समीक्षक असो की कवी त्याला स्वतःचे स्वतंत्र असे मत असते. त्यामुळेच उत्तम शेर / गझल या बाबतीत एकवाक्यता होणे अशक्य. एखादा शेर रसिकाला वाह! क्या बात है असे म्हणायला भाग पाडत नाही म्हणजे तो शेर उत्तम शेर नव्हे का? कदाचित असेलही. हे त्या रसिकाच्या अभ्यासावर, अनुभवावर आणि गुणग्राहकतेवर अवलंबून असते. पहिल्यांदाच ऐकलेला साधाही शेर उत्तम वाटू शकतो तर एखादा उत्तम शेर वारंवार ऐकल्यामुळे रटाळ वाटू शकतो.
खरे तर गझलेत / शेरात वापरलेल्या प्रतिमा आणि प्रतीके शेराला वेगळेपण प्राप्त करून देत असतात. काळ कोणताही असू द्या. प्रतिमांचे काव्यात्मक संदर्भ बदलत जातात. अजूनही शायर चंद्र, तारे, सूर्य, पृथ्वी, आकाश, फुले, पाने, निसर्ग, मानवी भाव-भावना व्यक्त करण्यासाठी प्रतीकात्मक उपयोग करतो. मीर, गालिबही वापरत होते. पण शेरातून अभिव्यक्त होणारी भावना, स्थिती यामध्ये टोकाचा फरक दिसतो. शब्द तेच, भावभावनाही त्याच पण त्यांना आपल्या स्वतःच्या शैलीमध्ये सादर करण्याचे कौशल्य हे प्रत्येक शायराचे वेगळे आहे. म्हणूनच आपण काहीतरी अकल्पनीय लिहिले म्हणजे आधुनिक किवा पारंपरिक ठरत नाही. तर आपण लिहिलेले रसिकांच्या मनाला भिडले पाहिजे हे जास्त महत्त्वाचे. साहित्य कधीही काळाच्या पुढे जात नसते किंवा मागे राहत नसते. ज्या काळात ते लिहिल्या जाते त्याच काळात वाचकांना, समीक्षकांना समजणे अपेक्षित असते. तेच साहित्य हृदयाचा ठाव घेणारे ठरते. गझलेचेही असेच आहे. ज्या शायरांनी तंत्र, आशयघनता आणि मांडणीतले नावीन्य सांभाळले तेच आपला विचार, गझल रसिकांपर्यंत पोचवण्यात यशस्वी झालेत.
‘गझलकार सीमोल्लंघन २०२२’ अंकात १३५ सहभागी गझलकारांच्या सुमारे ४०० गझलांचा आस्वाद आपण या दीपावली पर्वात घेऊ शकणार आहात. अनेक सन्माननीय गझलकार आणि नव्या उमेदीने लिहिणारे नवगझलकारांच्या उत्तमोत्तम गझलांचा कारवाँ सोबत घेऊन प्रवास करणारा हा मराठी गझल विशेषांक आहे. म्हणूनच जगभरातील सर्व गझल रसिकांना हा विशेषांक सर्वांगाने आनंदानुभूती देईल यात शंका नाही. अंकाच्या ‘विशेष’ सदरात गझलगंधर्व सुधाकर कदम यांनी 'दूर तिथे घन बरसे ' या गझलेच्या सांगितिक निर्मितीचा प्रवास आणि संगीतकार, गायक प्रा. हर्षवर्धन मानकर यांनी संगीतबद्ध करून गा गायिलेली गझलकार श्रीकृष्ण राऊत यांची 'तुझ्या हासण्याचे दिवाणे किती ' ह्या सदाबहार गझलेचा ऑडिओ-व्हिडिओ रुपात आस्वाद घेता येणार आहे. हेमंत पुणेकर यांचा 'गझल लिहिणे बंद करा ' शीर्षकाचा गझलेतील भाषेच्या लवचिकतेचा स्वीकार का करावा हे सोदाहरण समजून सांगणारा लेख आहे. तर कालिदास चवडेकरांच्या पाच हझला आपल्याला निश्चितच विशेष आनंद देऊन जातील. व्यंकटेश कुळकर्णी यांचा ‘मराठी गझल:आशय संपन्नता की तंत्रशरणता? या शीर्षकाचा लेख नवगझलकारांना गझलतंत्राविषयी मार्गदर्शन करीत नवी दृष्टी प्रदान करतो. ‘मुस्लीम मराठी गझलकारांचे मौलिक योगदान’ हा बदिऊज्जमा बिराजदार यांचा लेख मराठीतून गझल लेखन करणाऱ्या मुस्लीम गझलकारांची ओळख करून देणारा आहे.
या सोबतच ‘आस्वाद’ या सदरात अशोक वाडकर यांनी 'आमची गझलसाद ' या प्रातिनिधिक गझलसंग्रहाच्या निर्मितीचा प्रवास आणि परिचय त्यांच्या लेखातून करून दिला आहे. इलाहींच्या 'एकाकीपण 'या गझलेचे अतिशय सुंदर रसग्रहण रोहिणी पांडे यांनी केले आहे. त्याचप्रमाणे 'गझल प्रेमऋतूची’ हा प्रेमाचा विषय घेऊन प्रा. सुनंदा पाटील गझलनंदा आणि प्रसाद कुलकर्णी यांच्या गझलसंग्रहाचा परिचय सौ. सरोज अंदनकर यांनी करून दिला आहे. श्रीकृष्ण राऊत यांच्या 'गझलाई ' या आस्वादात्मक लेखसंग्रहावर 'गझलाई : समकालीन गझलचे प्रातिनिधिक प्रतिबिंब ' हा समीक्षणात्मक लेख शिवाजी जवरे यांनी लिहिला आहे. भूषण कुळकर्णी यांच्या गझलसंग्रहाचे रसग्रहण ‘ चौकोनी अंबर: तरुणाईची गझल’ या शीर्षकाचा लेख अविनाश चिंचवडकर यांनी लाघवी भाषेत केले आहे. संतोष कांबळे यांच्या ‘तुकोबाच्या कुळाचा वंश’ या गझलसंग्रहाचे रसग्रहण निशा डांगे यांनी केले आहे. निलेश कवडे यांच्या ‘दस्ती’ या गझलसंग्रहाचे रसग्रहण ‘सर्वसामान्यांच्या वेदना अंकित करणारी अभिव्यक्ती : दस्ती’ या शीर्षकाने अरुण विघ्ने यांनी केले आहे. अल्पना देशमुख-नायक यांच्या 'नदीला गाज नाही ' या गझलसंग्रहाचा परिचय चंद्रकांत धस यांनी करून दिला आहे. सुरेश भटांच्या ‘रंगुनी रंगात साऱ्या’ या गझलेचे रसग्रहण किरण डोंगरदिवे यांनी केले आहे. तसेच श्रीकृष्ण राऊत यांच्या गझल पण 'बोलकी ' आहे ! हे विनोद देवरकर यांनी केलेले रसग्रहण उत्कृष्ट आहे.अविनाश सांगोलेकर यांच्या ‘अविनाश पासष्टी’ या गझलसंग्रहाचे दीपक करंदीकर यांनी ‘सामाजिक हतबलतेतून जगण्याचे भान देणारी अविनाश पासष्टी’ या शीर्षकाखाली उत्तम परीक्षण केले आहे.
या वर्षी आपण काही गझलकार मित्रांना गमावले. ही बाब निश्चितच दु:खदायी आहे. ‘जसे येते तसे घ्यावे प्रिया आयुष्य वाट्याला’ हा अमोल शिरसाट यांचा लेख गझलकारा सुप्रिया मिलिंद जाधव यांच्या अभिव्यक्तीवर प्रकाश टाकणारा आहे. गझलेसोबत घालवलेल्या चिरंतन क्षणाची उजळणी करणारा आहे. योगिता पाटील यांनी 'मैत्र जीवांचे जपणारे गझलकार : कमलाकर देसले ' या लेखात त्यांचे अजातशत्रू व्यक्तिमत्व समर्पक शब्दात मांडले आहे. या दोन्ही गझलकारांना भावपूर्ण श्रद्धांजली.
औरंगाबादस्थित साईनाथ फुसे यांनी काढलेले छायाचित्र मुखपृष्ठाकरिता उपलब्ध करून दिले. ग्राफिक्सच्या माध्यमातून विनोद देवरकर यांनी त्याला सुरेख केले. यांच्यासह सर्व गझलकार, गझलकारा, अभ्यासक यांच्या लेखन सहकार्याशिवाय अंक साकार होणे अशक्य होते, याची नम्र जाणीव संपादकांना आहे. म्हणूनच प्रस्तुत अंकाला योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार. आजपर्यंत प्रकाशित झालेल्या 'गझलकार सीमोल्लंघन'च्या सर्वच अंकांना जगभरातल्या मराठी गझल रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. याही वर्षी तो अपेक्षित आहे. सर्वांना सीमोल्लंघनाच्या-दीपावलीच्या अंतःकरणपूर्वक शुभेच्छा.
- संपादक
No comments:
Post a Comment