१.
स्पर्शात नदी होती नजरेत झरे होते
जे प्रेम तुझ्यावर होते... खरेखुरे होते
कुठे काय होते रे माझे सांगायाला
तू माझा होतास एवढेच पुरे होते
खरे खरे ते लिहायची हिम्मत केली मी
त्या गझलेमधले सगळे शेर खरे होते
नंतर नंतर ऊन वाढले नात्यामध्ये
आधी आधीचे पावसाळे बरे होते
बघून झाले.. बुडून गेले.. सरून गेले...
डोहाचे डोळे फार फार गहिरे होते
२.
तूच बघ काय केलीस माझी दशा
रे, तुझ्या दोन डोळ्यात आहे नशा!
मौन ओठात ठेवून नजरेमधे
हे किती प्रश्न आणि किती चौकशा
चल करू ठीक सारे पुन्हा पूर्ववत
पण चुका ही करूया जशा च्या तशा
गार हिरवे पुन्हा ऊन झाल्यामुळे
भोवती सावल्या छानशा छानशा
ज्यात सामावले विश्व माझे तुझे
त्या मनाच्या व्यथा एवढ्याशा कशा?
चार मिनिटात सरले विषय चारशे
आणि हातामधे राहिल्या कपबशा
मीच होती दिली दाद ओठातुनी
आज टाळ्या पुन्हा वाजवू का तशा
मी जरा हासले...पांगल्या मैफिली
मी रडू लागता केवढा हा हशा
मग पुढे दूर गेले तुझे मित्रही
ना मला राहिल्या मैत्रिणी फारशा
No comments:
Post a Comment