१.
इच्छा आणिक आशा उद्दाम कैकदा
जगणे म्हणून होते बदनाम कैकदा
भेटीमधेच एका माणूस ज्या कळे
त्याचीच भेट घ्यावी मुद्दाम कैकदा
अश्रूत कुस्करूनी स्वप्ने जुनी-नवी
आम्ही भुकेस देतो विश्राम कैकदा
मारून मस्त गप्पा घरच्यांसवे उगी
सारे फिरून येतो मी धाम कैकदा
श्वासासवेच आला आहे ' इगो ' जरी
त्याच्यामुळेच होतो संग्राम एकदा
२.
फूल हाती लागले वा लागला काटा कधी
जीवनाने ठेविला ना राखुनी वाटा कधी
तू अमंगल मी सुमंगल हा तसा अन् तो असा
या विचारांना जरासा देउया फाटा कधी?
तापत्या ग्रीष्मात झाले क्षणभराची सावली
पावलांना ' त्या ' खुबीने टाळती वाटा कधी
ओहटी -भरती , प्रशांती, जीवघेणी वादळे
यामधे पडतात का हो गुंतुनी लाटा कधी
भांडतो,चिडतो कधी संतापतो, रुसतो जरी...
होउ दे माझा - तुझाही गोड बोभाटा कधी
३.
कोणत्या युक्तीस कोठे वापरावे ?
जादुगाराला कुठे सारेच ठावे ?
माय-बापालाच ठरवू द्या मुलांनो
कोण कोणाच्या कधी वाट्यास यावे
विसरण्यावाचून गत्यंतरच नाही
तू मला अन् मी तुला का आठवावे ?
लागती जेव्हा कधी भिंती खचाया
नेमके तेंव्हा छताने सावरावे
संपले आयुष्य की संपून जाती
सोवळ्या अन् ओवळ्याचे बारकावे
वाह्ह... क्या बात...
ReplyDeleteव्वा..खूप छान.!
ReplyDeleteअप्रतिम गझला
ReplyDeleteअप्रतिम खास करून 3री गझल.. अभिनंदन
ReplyDeleteअतीशय अप्रतिम गझल.
ReplyDeleteवाह! तीनही रचना अप्रतिम आणी मार्गदर्शक
ReplyDeleteइगो, बोभाटा आणि विसरण्यावाचून गत्यंतर नाही फारच सुंदर....!
ReplyDeleteVery very nice gazals
ReplyDeleteवाह वाह! खूपच सुंदर गज्ञला!
ReplyDeleteख़ास है भाई
ReplyDeleteमस्त ! मला दुसरी सर्वात जास्त आवडली ! 👌
ReplyDeleteअर्थपूर्ण! भावपूर्ण... आणि भावगर्भ.
ReplyDeleteखूप सुंदर गझला सरजी, मनःपूर्वक अभिनंदन!
ReplyDeleteसुंदर..
ReplyDeleteअप्रतिम गझल..
नेहमीप्रमाणे..