१.
मी बदललेली मला दिसलेच नाही
आरशाला मी खरी कळलेच नाही
ठेवला विश्वास माझ्या मनगटावर
चालताना वाट मग अडलेच नाही
काळजीने काजळी चढते मनावर
सत्य कळते पण तरी वळलेच नाही
कृष्ण होता सारथी माझ्या रथाचा
व्हायचे अर्जुन मला जमलेच नाही
फक्त कफनी घालण्याला अर्थ नाही
सत्व चित्ताला कधी शिवलेच नाही
२.
नेमके कसे जगायचे मला कळेल का?
चेह-यापलीकडील चेहरा दिसेल का?
लोभ, मोह, क्रोध, शोक भोग प्राक्तनातले
ठेवुनी अलिप्त सर्व मोक्ष सापडेल का?
ताठ मान ठेवली सदैव शत्रुच्या पुढे
आपल्यांसमोर आज वाकणे जमेल का?
जीवनात कर्म भोग सोसलाच पाहिजे
दृष्ट काढली तरी इडा पिडा टळेल का?
चालतात सर्व रोजचीच वाट ही जरी
वेगळी दिशा कुणासही कधी मिळेल का?
३.
पाय घेतला मागे नाव पाहिल्यानंतर
मित्र तोच आठवला घाव पाहिल्यानंतर
रिक्तता मनामध्ये आत खोलवर गेली
मान-पान, कीर्तीची हाव पाहिल्यानंतर
विश्व पालथे सारे घातलेस जीवनभर
माय बाप आठवले गाव पाहिल्यानंतर
घेतली विकत दु:खे सारले सुखांना मी
एवढेच परवडले भाव पाहिल्यानंतर
फेकतो कसे फासे शत्रु जिंकण्यासाठी
चाल आपली ठरते डाव पाहिल्यानंतर
.................................
सौ. अंजली आ. मराठे, बडोदे, गुजरात
अंजली , तिन्ही गझल खूप सुंदर आहेत.
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteफार सुंदर अंजलीजी
ReplyDeleteमनापासून आभार सर 🙏
ReplyDeleteअंजली
good. nice. - Kedar Patankar
ReplyDelete