दोन गझला : अरुण विघ्ने


१.

नभाला भिडावे निळ्या पाखरांनी
नवे गीत गावे निळ्या पाखरांनी

उपाशी रहा पण पुरेसे शिकावे
विचारी बनावे निळ्या पाखरांनी

कमाई करूनी तयातून थोडे
महादान द्यावे निळ्या पाखरांनी

जपा स्वाभिमाना भिमाला स्मरूनी
विहारात जावे निळ्या पाखरांनी

न हुरळून जाता,मना आवरावे
स्वतः सिद्ध व्हावे निळ्या पाखरांनी

भिमाच्या रथाला, पुढे नेत जावे
दिशादर्श व्हावे निळ्या पाखरांनी 

तुझ्या लेखणीने जगा जागवावे
समाजा जपावे निळ्या पाखरांनी


प्रत्येक चेहरा बघ थोडा मलाल आहे
ताटात भाकरीचा रोकड सवाल आहे 

सोडून दंगलीला हातात लेखणी घ्या 
अज्ञान बोडख्याने होतो बवाल आहे

बाजारभाव ज्यांनी ठरवून बघ चढवला
एकाच दावणीचा इथला दलाल आहे

चवदार मालपाणी खाऊन गावकीचे
फुगले शहर किती हे खेडे बकाल आहे

जोडून माणसांना नांदेल  लोकशाही
फोडू नका फटाके हेतू विशाल आहे

दुःखात फार होतो सारेच काल आम्ही
का आज मग उधळतो दारी गुलाल आहे

कोणावरी निशाणा घायाळ कोण होती
शाबूत बोलणारा भोंगा  हलाल आहे

..........................................
अरुण विघ्ने
मु.पो.रोहणा
त.आर्वी,जि.वर्धा.

No comments:

Post a Comment