दोन गझला : निशा डांगे



१.

एक पाटी असावी मंदिराच्या पुढे
धर्म मोठा नसावा माणसाच्या पुढे

मानली हार नाही वादळाच्या पुढे
लाख येतील संधी जिंकण्याच्या पुढे

मान्य आहेस मोठा रुक्ष निवडुंग तू
ऐक! नमशील नक्की केवड्याच्या पुढे

जीवघेणे नको ते वार आता पुन्हा
भिंत मोठी उभारू काळजाच्या पुढे

थेंबभर तेल नाही चेतवाया दिवा
थांबली रात्र काळी उंबऱ्याच्या पुढे

सोड मतभेद सारे वाद मिटवू जुने
फार झाला दुरावा साहण्याच्या पुढे

२.

मी खुले आकाश माझे एकटीने शोधते
हा तुझा मी सोनियाचा पिंजराही तोडते

तोडल्यावर बंध सारे पाय झाले मोकळे
पैंजणे पायात स्वप्नांची नव्याने बांधते

वेदना गझलेत माझी गुंफते मी कैकदा
दाद आणिक वाहवा मग मैफलीला लाभते!

शेवटी अफवेत आले नाव माझे एकदा
व्यर्थ ही अफवा जगाला बातमी का वाटते?

सात जन्माची कशाला एवढी चर्चा हवी?
एकट्या जन्मास सगळे दान द्यावे लागते
.................................
निशा डांगे/नायगांवकर
पुसद

4 comments:

  1. एक पाटी असावी मंदिराच्या पुढे
    धर्म मोठा नसावा माणसाच्या पुढे

    ..अप्रतिम शेर..

    ReplyDelete
  2. वेदना गझलेत माझी गुंफते मी कैकदा
    दाद आणिक वाहवा मग मैफलीला लाभते!

    ..खूप छान.. इथे मला देवदास चित्रपटाला तो शेर आठवला..
    दिल के छालों को कोई शायरी कहे तो दर्द नहीं होता
    तकलीफ तो तब होती है, जब लोग वाह-वाह करते हैं।

    ReplyDelete