१.
महागाई किती वाढो,कुणा होवो भले तोटा
तुला सत्ता सुरक्षा घे; बिछान्यावर पसर नोटा
जराही काळजी नाही बळीच्या वीज-पाण्याची
अरे, तो अन्नदाता पण कितीदा जाळतो पोटा!
तुला का वाटले नाही दिल्या वचनास पाळावे?
स्वतःचा शोध घे आधी; पुन्हा त्याला ठरव खोटा
मताला जागले नाही,खरे जे बोलले नाही?
अशांना दाखवू जागा, बटण दाबून ते 'नोटा'
यशाची पायरी होते सरावाने गड्या सोपी
प्रयत्नांच्या पुढे नसतो कुणी मोठा,कुणी छोटा
कितीदा जातवारीने पुन्हा रांगेत थांबावे?
करूया सिद्ध गुणवत्ता; नको राखीव तो कोटा
२.
लाचार काजव्यांशी फटकून वागतो मी
अंधार जाळण्यास्तव रात्रीस जागतो मी
आनंद मिळवण्याचा सोपाच मंत्र माझा
स्वार्था वजा करूनी दुःखास भागतो मी
शोधून सापडेना सटवीस भाग्यरेखा
कर्तृत्व दाखवाया प्रारब्ध डागतो मी
रक्तात लोकशाही भिनली अता अशी की,
जर लादली गुलामी नेतृत्व त्यागतो मी
लावू नकोस तू ही अंदाज ताकदीचा
कवटाळण्या नभाला आकाश मागतो मी
विश्वास दान देतो पण गर्व शून्य आहे
मैत्रेय गौतमाच्या नात्यात लागतो मी
३.
नाही जरी अता मी स्पर्धेत जीवघेण्या
आहे जिवंत तरिही यात्रेत जीवघेण्या
राहायचा कधी जो हृदयात मानवाच्या
'तो' राहिला न आता श्रद्धेत जीवघेण्या
जाणून बंद केले देवा नवस तुलाही
बकरा बळीस जातो जत्रेत जीवघेण्या
मंजूर आज केला प्रस्ताव शांततेचा
काही शहीद झाले चर्चेत जीवघेण्या
त्या सर्व लेकरांना दे हात संकटी तू
खाती गटांगळ्या जे गर्तेत जीवघेण्या
..........................................
विनोद देवरकर, उमरगा
मो. ९४२१३५५०७३
सुंदर
ReplyDeleteमनस्वी धन्यवाद सर🙏
Deleteबढिया
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद !
Delete