१.
सुखाला स्पष्ट दिसते की दिसत नाही
कि त्याला नेमके आम्ही दिसत नाही ?
तुझा पत्ता कुणाला मी विचारावा ?
इथे रस्त्यावरी कोणी दिसत नाही
हवा बाहेरची बहुधा दिसू शकते
हवा डोक्यात गेलेली दिसत नाही !
तपासुन पाहिले काळीज अपुले तर
तिथे अजिबात माणुसकी दिसत नाही
जगाने लावले उलटे दिवे आता
म्हणुन अंधारही खाली दिसत नाही
बरे वाईट जे आहे, बघुन घ्यावे
पुन्हा मेल्यावरी काही दिसत नाही
२.
गुंतलो की पुढे अडथळा राहतो
मी म्हणुन मोकळा मोकळा राहतो
वारशावर विसंबून जो राहिला
जन्म त्याचा लुळापांगळा राहतो
काळजाचे पदर कोरडे कोरडे
फक्त चर्येवरी कळवळा राहतो
संभ्रमाच्या पुढे जात नाही नजर
जन्म हा जन्मभर आंधळा राहतो
जो निघाला स्वतःलाच शोधायला
तो जगापासुनी वेगळा राहतो
३.
बोललो नाही तुला मी, बंद वाचा ठेवली
मी तुझ्यासाठी मनाच्या आत जागा ठेवली
काळजातुन ऐकली तर समजुनी येते सहज
वेदनेने आसवांची एक भाषा ठेवली
आठवांची पंढरी डोळ्यामधे आहे तुझी
मी तळाला पापणीच्या चंद्रभागा ठेवली
जात धर्माच्या नशेने झिंगल्या इथल्या पिढ्या
ही कुणी मेंदूत त्यांच्या भूतबाधा ठेवली
जाणवू नाही कुणाला होरपळ जगण्यातली
जिंदगी ओलीस म्हणुनी संभ्रमाला ठेवली
.................................
गजानन वाघमारे
मु.पो.ता. महागाव जि. यवतमाळ
No comments:
Post a Comment