१.
एकटी जाणार आहे,कोणता वावर नसो
वाट माझ्या मालकीची,घर नसो छप्पर नसो
तू दिलेले सर्व काही सोडुनी आले इथे
कोंडुनी जे मारते ते दुष्टसे सासर नसो
शांत वाटे या घडीला , मी इथे आनंदले
धूळ होणे ठरविले , ते देखणे अंबर नसो
मी कशी स्वप्ने उद्याची रंगवू वाऱ्यावरी ?
वास्तवाचे प्रश्न मोठे,त्या भले उत्तर नसो
ही कशाने तृप्तता आली मला या जीवनी
सुख असो वा दुःख आता त्यामधे अंतर नसो
कोणत्याही वादळाची शक्यता टाळू नको
जे मिळे ते युग सुखाचे त्यास मन्वंतर नसो
आपल्याही आतला आवाज आहे सांगतो
देव ज्याला मानले तो नेमका पत्थर नसो
२.
त्यांचेच काव्य का रे ,माझ्या समान होते
जे दुःख भोगते मी,त्याचे दुकान होते
होतात षंढ दुःखे जेव्हा इथे कुणाची
परकीय वेदनेचे दत्तक विधान होते
ते चोरतात कविता,गझला जरी कुणाच्या
हेही गुमान होते तेही गुमान होते
तृप्ती मला सुखाची आली जरा सख्यांनो
जे प्राशिते अता मी,त्यांची तहान होते
मारू नकोस चकरा मृत्यू इथे अशा तू
वैद्यास जे कळाले ,पक्के निदान होते
मृत्यू जरी 'प्रभा' चा झाला इथे अचानक
जगण्यास फक्त कविता,कारण किमान होते
३.
मद्यालयात आता गर्दी चिकार झाली
पेल्यात वादळाची नांदी तयार झाली
भांडावयास कोणी सख्खेच पाहिजे रे
सावत्र माणसांची ईर्षा टुकार झाली
कैफात जीवनाला जिंकून घेतले मी
जागेपणात त्यांची स्वप्ने फरार झाली
चोरून चार ओळी केला प्रयास ज्यांनी
काव्यात नोंद त्यांची अगदी सुमार झाली
दुखवू नका कुणाला उन्मत्त पारध्यांनो
सांगेल रान सारे तुमची शिकार झाली
करतील आज तेही भाषा 'करोड'तेची
भिक्षा नकाच घालू पात्रे भिकार झाली
सांगा 'प्रभा' स कोणी जाऊ नकोस तेथे
रोखीत घेतलेली नाती उधार झाली
तिसरी गझल मस्त आहे
ReplyDeleteधन्यवाद 🙏
ReplyDelete