ख्यातनाम उर्दू शायर मिर्जा गालिब यांच्या २२५ व्या जन्म दिवसाचे औचित्य साधून २७ डिसेंबर २०२१ सोमवारी इचलकरंजी येथे एका आगळ्या वेगळ्या गझलसंग्रहाचे प्रकाशन झाले 'गझल प्रेमऋतूची' हा संग्रह आहे दोघांनी तयार केलेला. दोघेही स्व. सुरेश भट (दादा ) यांचे शिष्य . एक गझलकारा तर दुसरे गझलकार . एक जण महाराष्ट्राच्या अति पूर्वेच्या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शीच्या , तर दुसरे अति पश्चिम म्हणजे कोल्हापूर जिल्हयातीत इचलकरंजी येथील.
१९७९ पासून गझल विश्वात रमलेली , सुरेश भटांकडे गझलेचे शिक्षण घेतलेली जेष्ठ गझलकारा प्रा. सुनंदा पाटील म्हणजेच गझलनंदा . आणि अवघ्या महाराष्ट्राला ज्ञात असलेले , हजारो लेख / भाषणे / गझल या प्रांतात मुशाफिरी करणारे सामाजिक कार्यकर्ते आणि जेष्ठ गझलकार प्रसाद कुलकर्णी . मुखपृष्ठापासूनच हा गझल संग्रह वाचकाचे लक्ष वेधून घेतो. 'प्रेमऋतूच्या पखरणी पूर्वी ' यात केलेलं प्रास्ताविक आणि मनोगत अत्यंत वाचनीय असेच आहे . प्रेमाची केलेली सुलभ व्याख्या प्रत्येकाला अगदी आपली वाटावी अशीच आहे. हे वाचताच पुस्तक खरेदी केल्याचे समाधान वाचकाला मिळते.
दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे , अतिशय निर्दोष मराठी गझल लिहिणाऱ्या 'गझलनंदा 'यांनी 'मराठी गझल : स्वयंअध्ययनाची अंकलिपी ' हा प्रदीर्घ लेख लिहिलेला आहे . याचा अभ्यास नवीन लिहू लागलेल्या गझलकारांना अतिशय मार्गदर्शक ठरणारा आहे. गझल लेखनाचा सराव करण्यासाठी ही अंकलिपी संग्रही असायलाच हवी .
तिसरे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यात सर्वच गझल या मुसलसल म्हणजेच एकाच विषयांवरील आहेत. तोही विषय प्रेमाचा. यात एकूण १०० गझलांचा समावेश आहे. दोघांच्याही ५० / ५० गझल. प्रेम हा विषय इतक्या विविधतेने मांडला जाऊ शकतो , याचेही आश्चर्य वाटल्या वाचून राहत नाही. याचा अर्थ आसा नव्हे की, केवळ तरुणांनाच हा संग्रह आवडेल . ज्यांचं मन अजून तरूण आहे , त्या प्रत्येकाने हा संग्रह जरूर खरेदी करावा. स्वतः वाचावा आणि दुसऱ्यांनाही भेट द्यावा . प्रकाशनपूर्व ह्या पुस्तकाची झालेली विक्री याची साक्ष देते.
'मला सांगायचे होते तुला जे काल ओठांनी
कसा ओठांवरी लिहिला तराणा लाल ओठांनी '
हे वाचताच गझलनंदा यांच्या लेखणीची ताकद कळून येते . डोळ्यासमोर चित्र उभं राहतं असा हा शेर वाटतो.
'तुझे ओठ ओठी किती मस्त मतला
करू दे पुरी तू गझल माझी मला '
प्रसाद कुलकर्णी यांचाही हार शेर तेवढ्याच ताकदीचा आणि खूप बोलका आहे. संग्रहाच्या सुरुवातीलाच दोन गझला आवर्जून अभ्यासाव्यात अशा आहेत . पुढे पुढे' एक एक अप्रतिम गझल पुढ्यात येते . एकदा पुस्तक हाती घेतले की , ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेववत नाही.
'सहा ऋतुंचे हसतमुखाने स्वागत करती प्रेमळ गझला
मी लिहिलेल्या शब्दांमध्ये प्रेमाचाही ऋतू असावा '
आणि
'प्रेमऋतूची अधरावरती गझल लिहावी
ओठाने तू गझल नव्याने वाचत जावी '
असे ताकदीचे गोटीबंद शेर या संग्रहात आहेत. प्रसाद कुलकर्णी यांचे काही शेर बघा.
'गाली खळी कळीची आता खुलून आली
गाणी तुझ्या बटांची ओठांमधून आली '
'वटवृक्ष बोललेला कानी हळूच माझ्या
माझ्या कडे नजाकत वेलीवरून आली '
आणि गझलनंदा म्हणतात
'तुला वाटते मोगरा माळते मी
तुझा श्वास घेऊन गंधाळते मी '
'जरा पानगळ चालली भोवताली
वसंतासवे आत रेंगाळते मी '
भुजंगप्रयात वृत्तातील हे अप्रतिम शेर आहेत. या शंभर गझलांमधील प्रत्येक शेर एक चित्रकाव्य आहे. शेर वाचला की डोळ्यापुढे चित्र उभे राहते. ही या संग्रहाची जमेची बाजू आहे. या गझल संग्रहात अनेक अक्षरगणवृत्ते आणि मात्रावृत्ते हाताळली आहेत. अभ्यासक , गझलगायक , संगीतकार आणि नव्याने मराठी गझल लिहू इच्छिणारे यांच्या साठी हा एक सुरेख गझल संग्रह भेटीला आलेला आहे . आपल्या प्रियजनांना भेट देण्यासाठी अतिशय उपयुक्त असा संग्राह्य गझलसंग्रह म्हणजेच 'गझल प्रेमऋतूची '.
..........................................
सौ .सरोज अंदनकर , नागपूर
गझल प्रेमऋतूची :
गझलनंदा / प्रसाद कुलकर्णी
पृष्ठ - १४०
किंमत रू.१७५/-
प्रकाशक- प्रसाद माधव कुलकर्णी
इचलकरंजी
संपर्क :
प्रा .सुनंदा पाटील
प्रसाद कुलकर्णी
No comments:
Post a Comment