तीन गझला : अविनाश सांगोलेकर


१.

वर्ष नवे हे  आले आले !
चंगळवादी सुसाट झाले!

आशा होती खूप खूप पण -
उपेक्षितांचे हालच चाले

हलली नाही स्थिती जराही
काळ मात्र हा केवळ हाले

केली नाही क्षमा जराशी
रक्तांनी मग भरले नाले !

हा ' अविनाश ' च सांगत आहे,
" रागाचे ते नकोत भाले !"

२.

दिवस येतो, दिवस जातो, कळत नाही
दु:ख आले एकदा की टळत नाही 

पापण्यांची बांधली धरणे जरीही
लोचनांचे मात्र पाणी खळत नाही

पालवीची वाट बघणे सोडले मी
जीर्ण झाले पान , तेही गळत नाही

' त्या ' जळावू माणसांची राख झाली
मीच उरलो, जो कुणावर जळत नाही

पाहिली ती संकटे  अन् 'ते ' पळाले
मात्र हा' अविनाश ' कोठे पळत नाही

३.

का असे हे रुष्ट झाले हृदय माझे ?
वेग देता मंद चाले हृदय माझे

हे निळेकाळे कशाने हृदय झाले ?
दु:खितांचे दु:ख प्याले हृदय माझे

ध्रुवताऱ्यासारखे जे अढळ होते
खालती का तेच आले हृदय माझे ?

संकटांशी विश्व जेव्हा झुंज देई
त्यामधेही चित्त घाले हृदय माझे !

प्रेम, माया अन् जिव्हाळा थोर सारे
नित्यनेमे त्यात न्हाले हृदय माझे

तो उद्याचा काळ काही आकळेना
काळजीने पार हाले हृदय माझे

काळजी  'अविनाश ' आता दूर झाली ,
ईश्वरी चैतन्य ल्याले हृदय माझे !

.................................
डॉ.अविनाश सांगोलेकर
डी - २०२ , विंडसर रेसिडेन्सी,
बालेवाडी फाटा, बाणेर, पुणे - ४११०४५
भ्रमणध्वनी : ९८ ५० ६१ ३६ ०२
ई-मेल : sangolekar57@gmail.com

No comments:

Post a Comment