दोन गझला : सुप्रिया हळबे

१.

तुझ्याकडे चोरून पाहणे म्हणजे पाउस 
तुला भेटणे मिठीत भिजणे म्हणजे पाउस 

तू नसल्यावर बोलत असते मुकी डायरी 
शब्दांमधले  मूक वाहणे म्हणजे पाउस 

उरात धडधड, झरती डोळे, अशक्य हुरहुर
आठवणींना रोज वेचणे म्हणजे पाउस 

कॉफी, गप्पा, गझला, कविता.. आपण दोघे
दोघांमधले अंतर मिटणे म्हणजे पाउस 

हातामध्ये हात तुझा श्वासांची फुगडी
किलबिल डोळ्यांतून बोलणे म्हणजे पाउस 

थेंब टपोरा ओठांवरती बघ ओघळला
मनातले थेंबाला कळणे म्हणजे पाउस 

गुलाब, अत्तर, श्वास, मिठी अन् बरेच काही
तुझ्याचसाठी रोज बरसणे म्हणजे पाउस 

ऐक...सुप्रिया तुला सांगते गूज मनीचे
कवितेमध्ये तुला गुंफणे म्हणजे पाउस 

२.

अंतरीच्या वेदनेला मज पुरावे लागले
उमलले मग फूल त्यातुन अन् हसावे लागले

का नको तेव्हाच आली आसवे डोळ्यांमधे
का नको तेव्हा मला डोळे पुसावे लागले.

वेदना सांगू कुणाला आप्त नव्हते राहिले
भोवती जे राहिले त्यांचेच व्हावे लागले

सोबती आले न कोणी साद मी घालूनही
माझिया भाग्यातले मज निस्तरावे लागले

फूल जे बहरायचे डोलायचे वेलीवरी
सांज झाली आणि त्यालाही गळावे लागले

दुःख माझे ऐकुनी पाणावले डोळे तुझे
कोरड्या डोळ्यांस माझ्या बघ झुरावे लागले

हात त्याने सोडला अन पोरके केले मला
पोरकी नव्हते... जगाला भासवावे लागले.

तू दिले होतेस तेव्हा साथ देण्याचे वचन
का तुला जवळून माझ्या दूर जावे लागले

सुप्रियाची जिद्द होती हार नाही मानली
निसटत्या नात्यास सुद्धा प्रेम द्यावे लागले

.....................
सुप्रिया हळबे


4 comments:

  1. वाह! सुरेख गझल सुप्रिया

    ReplyDelete
  2. अप्रतिम सुप्रियाजी

    ReplyDelete
  3. मस्त ! 👌

    ReplyDelete
  4. अप्रतिम

    ReplyDelete