१.
समज एवढी कुठून येते मुलींना
कोण समजून इतके घेते मुलींना
असतात जरी मुली कितीही लाडक्या
परस्पर एक सासर नेते मुलींना
मक्तेदारी होती तुमची मुलांनो
जमते सारे आता ते ते मुलींना
चूल सांभाळ जी म्हणायची मुलींना
आई हल्ली पुस्तक देते मुलींना
एवढा करू प्रयत्न आपण यारहो
मिळायला पाहिजे हवे ते मुलींना
२.
तुझ्या मिठीची नशा निराळी
जशी नभाला धरा मिळाली
न मागताही सुखे मिळाली
जशी अचानक घरी दिवाळी
दुपार सारी अशीच गेली
नवीन संध्या नवी नव्हाळी
समोर आलीस , वाटले अन्
जशी उमलली फुले सकाळी
तुझ्या नकारातही दिलासा
मनास माझ्या फुटे लव्हाळी
३.
कोळून दुःख फार प्यायलो आहे
मी दुःखाच्या पार चाललो आहे
सुखाने मला जरा भुलवले होते
तरी त्यातुनी सहज निसटलो आहे
उरात जपल्या आहेत खूप जखमा
आणि सुखाशी किती भांडलो आहे
अता कुणाशी बोलायाचे नाही
एकांताशी खूप बोललो आहे
एकटाच मी बरा शोभतो हल्ली
इतरांसाठी तसा संपलो आहे
No comments:
Post a Comment