दोन गझला : हेमंत रत्नपारखी



१.

काळजात खोल घाव घालतात आजकाल
त्याच वागण्यास रीत मानतात आजकाल

कोण सांगतो कुणास आपले खरे गुपीत
शब्द आपले जपून बोलतात आजकाल

मार्ग चांगला मिळेल शोध घेतल्यास तूच
वाट वाकडी उगाच दावतात आजकाल

कालचा रईस आज कर्जदार वाटल्यास
दोष देत त्यास दूर सारतात आजकाल

वागणे तुझे असेच संशयीत भासल्यास
लोक चार हात लांब ठेवतात आजकाल

स्वाभिमान संपताच संपतो खरा रुबाब
आब राखण्यास पाय चाटतात आजकाल

गोड फार बोलल्यास तू विचार आपणास
स्वार्थ साधण्या बरेच भेटतात आजकाल

२.

तू कशाला दाखवावी शान मोठी सागरा
ज्यात नाही गोड पाणी प्यावयाला पाखरा

आटल्या साऱ्या विहीरी कोरडी झाली तळी
कोरडा दुष्काळ येता मोल येई पाझरा

घेतला आहे कशाला भंगलेला बंगला
चांगला होता तुला तो झोपडीचा आसरा

मारता थापा पुढारी का खरे वाटे अता
पाहिला नाही तयांचा झाकलेला चेहरा

रोज वाढे मोह माया माणसांच्या अंतरी
संयमाच्या औषधाने त्यास थोडे आवरा


...............................
हेमंत रत्नपारखी
मंगळवेढा. जि. सोलापूर
9822233395

2 comments:

  1. सुहास बोकरेOctober 6, 2022 at 1:49 AM

    मस्त 👍🏼

    ReplyDelete
  2. सुंदर गझल। अभिनंदन।

    ReplyDelete