१.
मनाची जळमटे मी काढते आहे
मनाला स्वच्छ माझ्या वाचते आहे
जुन्या गोष्टी कधी ज्या टाळल्या होत्या
नव्याने त्या पुन्हा न्याहाळते आहे
कधीकाळी उन्हाशी भेटलो होतो
अताशा सावलीशी भांडते आहे
उभी आहे कधीची बाभळीखाली
तुला शोधीत अंतर मोजते आहे
जगाची बंधने मी तोडली आता
जरासे मोकळे मी बोलते आहे
२.
गाव माझा आजही धोक्यात आहे;
वादळाचा जोरही रोषात आहे!
पावसाला जाण, नाही माणसांची;
भय पुराचे वाढले, पोटात आहे!
राहिलेना आपले ,कोणी पुसाया;
साचलेले दुःख ,या डोळ्यात आहे!
सावरावे मी कितीदा, या मनाला;
गीत त्याचे आजही, ओठात आहे!
उत्तरे शोधू कशी मी जीवनाची;
प्रश्न ज्योती आजही,कोड्यात आहे!
३.
या उन्हाला झेलणारे दोन डोळे
सावलीला शोधणारे दोन डोळे
सांजवेळी एकटेपण खात असता
आसवांना ढाळणारे दोन डोळे
भोवताली दाटता अंधार सारा
चांदण्याला शिंपणारे दोन डोळे
आंधळी प्रेमात झाले मीच त्याच्या
काजव्यांना टाळणारे दोन डोळे
दुःख माझे सांगते माझ्या मनाला
भांडणाला जुंपणारे दोन डोळे
................................
सौ.ज्योती परशुराम शिंदे
रोहा - रायगड
मोः ९८५०२०३८६८
सुंदर भावस्पर्शी छानच
ReplyDeleteसुंदर भावस्पर्शी रचना छानच
ReplyDelete