१.
पुन्हा चर्चा कशाला हार झाल्यावर
नको सांत्वन मनावर वार झाल्यावर
किती सांभाळले नाते तरी तुटले
खरे ते बोलणे तलवार झाल्यावर
नकोसे राहणे वाटे मला तेथे
जिथे असणे तुझ्यावर भार झाल्यावर
कसा संन्यास घेऊ मी पुन्हा आता
तुझा माझा सुखी संसार झाल्यावर
कशाला पावसा छळतोस तू इतका
उन्हाने माणसे बेजार झाल्यावर
२.
भाव डोळ्यातला वाटतो लाजरा
बोलका वाटतो पण तुझा चेहरा
ओठ ओठांवरी ठेव ना तू जरा
सण सुखाचा पुन्हा होउ दे साजरा
दाबले रोजचे दु:ख मी अंतरी
पण तरी लागला स्वर पुन्हा कापरा
शक्य नाही तुला सारखे भेटणे
त्यामुळे जीवही कावरा बावरा
हो जरी मी तुला बोलले ना कधी
तू दिलेला तरी माळते मोगरा
.................................
सौ.गौरी ए.शिरसाट
विक्रोळी, मुंबई
No comments:
Post a Comment