तीन गझला : भागवत घेवारे


१.

स्वार्थासाठी वारी देवा
त्यासाठी मी दारी देवा

शंका का रे घेतो आहे
श्रद्धा माझी भारी देवा

धोधो झाल्या वर्षावाने
हानी झाली सारी देवा

पैसा गाठी नाही ज्यादा
शांती ही संसारी देवा

अंडी-मच्छी यापेक्षाही
साधी भाजी प्यारी देवा

वृत्ती माझी व्हावी ऐसी
माता वाटो नारी देवा

२.

मेडीटेशन करण्यासाठी गेला साला इगतपुरीला
विसरुन गेला स्टेशनवरती पाहुन बाला इगतपुरीला

नाव नोंदले शरीक झाला बोलायाला वावच नव्हता
बाष्कळ बडबड अन चरण्यावर लगाम आला इगतपुरीला

मोबाइलचा छंद जिवाला इतका होता नका विचारू
पुन्हा पुन्हा तो जातच होता हात खिशाला इगतपुरीला

सुंदर मुखडे : दिल के तुकडे ध्यानी स्वप्नी दिसू लागले
नजरेसमोर येउ लागल्या शीला, माला इगतपुरीला

दिवस लोटला कसा तरी पण बेचैनी ती वाढत गेली
संध्याकाळी दिसू लागला एकच प्याला इगतपुरीला

पहाटवेळी उठला परंतु चुळबुळ चुळबुळ करू लागला
दोन-चारदा बिन वल्लीचा जाउन आला इगतपुरीला

३.

जाऊ नको कुठेही तू तीर्थ प्राशण्याला
दारापुढे पुजारी घरपोच वाटण्याला

होताच स्नान ओठी पहिली तिलाच लावा
ठेवा जवळ सदोदित मग नित्य चुंबण्याला

पोथी पुराण गाथा झाकून कोपऱ्याला
आरास बाटलीने यावीच घरधन्याला

होताच देव दर्शन मग तीर्थ ते मिळावे
अन् मोकळीक व्हावी सर्वांस पाजण्याला

गुरुजी तुम्ही कशाला चोरून दूर जाता
ठेवा खिशात चपटी आदर्श सांगण्याला

घेऊन रोज थोडी विकण्यास काढ शेती
लाजू नकोस अंती तू भीक मागण्याला

.................................
भागवत घेवारे
९४२१९७८५९७

4 comments: