तीन गझला : योगेश उगले

१.

काहीतरी मुळाशी दोलायमान व्हावे 
तैसी अशाश्वताची ही नाव हेलकावे 

माझ्या दिठीस लागो आशा चिरंतनाची 
माझ्या कणाकणाला कैवल्यभान यावे 

जे खुद्द न्यायदाते अपराध तेच करती 
त्यांचे गुन्हे कुणाच्या कोर्टात नोंदवावे? 

कारण दुरावण्याचे मांडायचे कसे, जर 
काही तुला न ठावे, काही मला न ठावे 

मेंदूत माजली या न्यूरॉन्सचीच खळबळ 
हे कालबाह्य सर्किट आता किती जपावे? 

आयुष्य जोखले हे सांगू नकोस 'योगी' 
गेले सुटून अलगद कित्येक बारकावे 


२. 

बोलते लेकीस सासू अन सुनेला लागते 
एवढे कळले तरी पुष्कळ असावे वाटते 

जे ठरवले त्याहुनी भलतेच घडते नेहमी 
कोणत्या तालावरी ही जिंदगानी नाचते? 

केवढ्या आकाशगंगा रांगती डोळ्यामधे 
कोणते ब्रम्हांड माझी पापणी सांभाळते? 

वेदना पाहून दुसऱ्याची निघाला हुंदका.. 
आत माझ्याही कुणी माणूस आहे वाटते 

हेरुनी एकांत माझा आठवण येते तुझी 
त्याच वेळी आतुनी काहीतरी हेलावते 

वेगळे अस्तित्व योगी तू तुझे निर्माण कर 
राहुनी कळपात कोणाची प्रतिष्ठा वाढते? 

३.

एवढे सिरियस तरी व्हावे कशाला? 
कैकदा समजावतो माझ्या मनाला 

माणसे आहेत सारी चांगली, पण 
फक्त द्वेषाच्या मुळावर घाव घाला 

भावनांचे का करू वर्गीकरण मी? 
जाहला तर होउ द्या गोपाळकाला 

न्याहळत होतो तुझा डीपी जसा मी 
अन तुझा तितक्यामधे मेसेज आला 

आपले नाते कुणा कळणार आहे? 
काय सांगू आपल्याबद्दल जगाला? 

नेहमी दिसतो कुण्या तंद्रीत 'योगी' 
ना कशाचे राहिले अवधान त्याला 

2 comments: