दूर तिथे घन बरसे : गझलगंधर्व सुधाकर कदम


माझ्या बहुतेक सुरावटी , कविता वाचता वाचता आलेल्या आहेत.त्यासाठी आवडलेली कविता सतत वाचत राहतो.वाचता वाचता एखादी सुरावट उत्स्फूर्तपणे येऊन जाते.तेव्हाच माझे समाधान होते.नेमकी रचना या रागात की त्या रागात ह्या भानगडीत मी कधीच पडलो नाही.कवितेचे शब्दच सुरावटीला आवाहन करीत असावेत असे मला वाटते.
      सदानंद डबीरांची खालील रचना वाचत असतानाच त्यातील शब्दांना न्याय देणारी सुरावट आपोआप आली. यातील 'बरसे', या शब्दासाठी 'कोमल निषाद' व 'हलकासा' या शब्दासाठी 'शुद्ध निषाद (व षड्ज)असे दोन्ही निषाद एकापाठोपाठ आले आहे. त्यामुळे 'घन बरसे' या शब्दाला वेगळीच गोलाई आली आहे. तसेच 'हलकासा' शब्दांवरील स्वरांचे हेलकावे पण शब्दाला न्याय देणारे आहेत. यात शास्त्रीय संगीतातील 'अविर्भाव','तिरोभाव' व 'मूर्च्छना' वगैरे प्रकार आपणास दिसून येईल.माझ्या अल्पमतीप्रमाणे हा राग साधा सुधा 'वृंदावनी सारंग' असावा.पण 'मेघ' रागाची छाया घेऊन... ही सुरावट कशी आली, का आली...? मी सांगू शकत नाही.त्या वेळेपुरते मी माध्यम होतो.इतुकेची!
      व्होकल कॉर्ड्सचा त्रास वाढल्यामुळे मी जाहीर मैफली बंद केल्या.माझे गाणे बंद झाल्यामुळे ही रचना माझी मुलगी रेणू #सरगम_तुझ्याचसाठी या कार्यक्रमात 'सांजवेळ', 'गोंजारत' वगैरे शब्दांवर वेगवेगळ्या रागांच्या सुरावटी घेऊन गायची.ध्वनिमुद्रण उपलब्ध नसल्यामुळे प्रसिद्ध गायक मयूर महाजन यांचे आवाजात, संगीतकार म्हणून तालवाद्याविना आपणापुढे सादर करीत आहे...आवडल्यास तुमची, नावडल्यास माझी...
●mobile REC... headphone please

दूर तिथे घन बरसे... हलकासा
वाऱ्यावर गंध इथे... हलकासा

सांजवेळ अन् प्याले भरलेले
मैफिलीला रंग चढे... हलकासा

गोंजारत आल्या ह्या आठवणी
पाठीवर हात फिरे... हलकासा

No comments:

Post a Comment