जसे येते तसे घ्यावे ‘प्रिया’ आयुष्य वाट्याला : अमोल शिरसाट

 



     शेक्सपीअरच्या नाटकांमधे अनेकदा पात्र स्वतःशी संवाद साधताना दिसतात. तेव्हा श्रोते त्यांच्या भूमिकेशी एकरूप होऊन थोड्यावेळासाठी का होईना त्या पात्रांची भूमिका जगत असतात. गझल सुद्धा प्रथमतः स्वतःशी साधलेला सकारात्मक संवाद असते. या संवादात एक विलक्षण नाट्यमयता असते. कुठल्याही रंगमंचाशिवाय गझलकार तो जगत असलेल्या भूमिकेचे शब्दांमधून सादरीकरण करतो आणि रसिकांना त्याच्या भूमिकेशी एकरुप व्हायला भाग पाडतो. अशी एकरूप व्हायला भाग पाडणारी गझल लिहिणा-या सोलापुरच्या एक गझलकारा म्हणजे सुप्रिया मिलिंद जाधव. ( जन्म ६ फेबृवारी ‘६९) 

.........................

  जीवनात अनेकदा कठीण प्रसंग येतात. तेव्हा मनाची घालमेल सुरू होते. सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही प्रकारचे विचार मनात येतात. आतल्याआत एक मोठे युद्ध आपण अनुभवतो. खरं म्हणजे मनात असं विचारांच युद्धं अविरतपणे सुरू असते. तेव्हा शेक्सपीअरच्या हॅम्लेट सारखं स्वगत सुरू होते ‘To be or not be, that is the question’.( जगावं की मरावं? हाच प्रश्न आहे!) स्वगत म्हणजे स्वतःशी बोलणे. दैनंदिन जीवनातील स्वगतातून आपणसुद्धा स्वतःला पडताळत असतो. काय बरोबर काय चुकीचे ठरवत असतो. कधी कधी विचारांचे वादळ डोक्यात थैमान घालते तेव्हा न रहावून सुप्रिया जाधवांसारखं स्वतःला सांगतो -     

 

बरोबर की चुकीचे हे नको पाहूस आता

‘प्रिया’ निर्धास्त मांडावेस तू म्हणणे स्वतःचे


   असं प्रत्येकाला स्वतःच मत मांडता आलं पाहिजे पण एका स्त्रीला स्वतःचे म्हणणे मांडण्याचा अधिकार समाजात आजही नाही. तिचं अस्तित्व केवळ वंशवेल वाढवण्याचे साधन एवढंच आहे. आई, बहीण, मुलगी, प्रेयसी, बायको प्रत्येक माणसाला हवी असते. पण तिचं मत मात्र दुय्यम ठरवलं जातं. ती अनंत यातना भोगून त्याची वंशवेल वाढविण्याचे काम करते पण तो मात्र तिला दुय्यम ठरवून आयुष्यभर तिची पाळेमुळे खोदण्याचेच काम करतो.    


ती वंशवेलीला नभाशी पोचवे

तो खोदतो आहे तिची पाळेमुळे


  असा स्त्री जाणिवांचा अविष्कार सुप्रिया जाधव यांच्या गझलेत ठिकठिकाणी अनुभवायला मिळतो. त्यांची गझल वेदनांच्या जात्यात भरडून निघाली आहे. इलेक्ट्रीकल इंजीनीअरींगचा डिप्लोमा केल्यानंतर एका कंपनीत नोकरी करत असताना त्यांची ओळख मिलिंद जाधव यांचेशी झाली आणि दोघांनीही एकमेकांना आयुष्यभराचा साथीदार म्हणून निवडलं. आयुष्यभर साथ देण्याच्या आणाभाका घेतल्या परंतु काळाच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी होतं. २०१२ साली सुप्रिया जाधवांसाठी धडधडनारं ह्रदय अचानक बंद पडलं. पण सुप्रिया जाधवांनी मात्र स्वतःला खंबीर करत वाट्याला आलेलं आयुष्य जसं आहे तसं स्वीकारलं -  


खडा वा धान्य भरडू दे, कशाचे काय जात्याला

जसे येते तसे घ्यावे ‘प्रिया’ आयुष्य वाट्याला


  पण आयुष्य जसं आहे तसं स्वीकारणं सोपी गोष्ट नाही. आठवणींच्या पावसाने चिंब झालेल्या पापण्यांना कितीतरी रात्रपाळ्या कराव्या लागतात. पापण्यांना अशा रात्रपाळ्या सोसत नाहीत तेव्हा न रहावून म्हणावे लागते -  


आठवांनो जा निजा, अन् या सकाळी

पापण्यांना सोसवेना रात्रपाळी


  अशा अनेक रात्रपाळ्या सोसताना जिच्या खांद्यावर हक्काने डोकं ठेऊन रडता येईल अशी हक्काची मैत्रीण म्हणजे गझल. या मैत्रीणीचा हात धरला म्हणजे वास्तवाच्या विस्तवावरून चालणे सुसह्य होते. अनेक वादळांना ताठ मानेने तोंड देता येते. आणि अनेक वादळी तडाखे सोसून झुलणारी सुप्रिया जाधव नावाची डहाळी तर खूपच खंबीर आहे.   


तडाखा वादळी पचवून झुलते

किती खंबीर आहे ही डहाळी


     परंतु स्त्रीला अजूनही असं एकटीने साधा बसचा प्रवास देखील करणं खूप कठीण असते. मग आयुष्याच्या प्रवासाचं काय? आजुबाजुला प्रचंड कीर्र अंधारातून मार्ग काढताना केवळ त्याच्या आभासांचा हात धरून काट्याकुट्यातून मार्ग काढावा लागतो. सरळमार्गाने चालतानाही एकट्या स्त्रीवर अनेक आरोप केले जातात. तिची सरळ चालही लोकांना उलटीच दिसते तेव्हा सुप्रिया जाधव अशा लोकांना मोलाचा सल्ला देतात - 


चाल माझी वाटते उलटी तुला?

सोड बाबा सोड शीर्षासन तुझे!


  अशा उलट्या डोक्यांना तोंड देता देता नाकी नऊ येतात. तेव्हा सुप्रिया शब्दांचे हत्यार हाती घेतात - 


शब्दांचे हत्यार करू चल

छातीवरती वार करू चल

हात धरू एकटेपणाचा

मिळून रस्ता पार करू चल


  असा आपल्या एकटेपणाचा हात धरत चालणेही सोपे नाही. आपल्या अनेक इच्छांना आपल्याच ठोकरीने उडवावे लागते. 


घुटमळत पायात होती कोडगी इच्छा

ठोकरीसरशी उडवली मीच येताना


  आपल्या इच्छा ठोकरीने उडवताना आपणच आपले शत्रु होऊन बसतो तेव्हा शत्रुंची यादी बनवताना स्वतःचेच नाव पानभर लिहावे लागते  


काल शेवटी शत्रुंची यादीच बनवली

नाव स्वतःचे लिहीत गेले पूर्ण पानभर


सुप्रिया जाधवांचा मराठी गझल रसिकांच्या सदैव स्मरणात राहील असा त्यांचा आणि एक सिग्नेचर शेर म्हणजे 


हिरकणी इतकीच फरपट रोज होते

फक्त अमुचा पाठ अभ्यासात नाही 


लग्नानंतर अनेक वर्ष माध्यमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्य करणा-या सुप्रिया जाधव यांनी गझल शिकण्याच्या प्रक्रियेत सोशल मिडीयाचा वापर करून एखाद्या विद्यार्थ्यासारखे गझलेचे तंत्र अवगत करून घेतले आहे. त्यांची लेखणी काहीवेळा जास्त भाऊक होते, अनेकदा विरह भावनेची पुनरावृत्ती होताना दिसते परंतु सहजता, नादमाधुर्य, वाचकाला वश करून घेण्याची क्षमता आणि प्रतिमा-प्रतिकांचा योग्य वापर ही त्यांच्या गझललेखनाची काही वैशिष्ट्ये आहे. 

  सुप्रिया जाधवांचा ‘कोषांतर’(२०१७) हा गझलसंग्रह म्हणजे त्यांनी एकटीने प्रवास करताना मनाची झालेली घालमेल, इतरांनी केलेली प्रतारणा, वाट्याला आलेल्या विवंचना आणि मिलिंद जाधव यांचे अस्तित्व यांचे ह्रदयस्पर्शी मिश्रण असलेले आत्मचरित्रच आहे. या संग्रहाला मनोरमा सोशल फाऊंडेशन व मसाप, सोलापूरचा मनोरमा साहित्य पुरस्कार,  गझलदीप प्रतिष्ठाण, मुर्तिजापूरचा स्मृतीशेष उ. रा. गिरी पुरस्कार, मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणेचा कै. चन्द्रशेखर यशवंत वाघ स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय पुरस्कार, लोकगंगा राज्यस्तरीय ग्रंथ पुरस्कार, अक्षर गौरव साहित्य पुरस्कार, सातारा असे अनेक  सन्मान प्राप्त झालेले आहेत. त्याचबरोबर गझललेखनासाठी त्यांना रंगतसंगत प्रतिष्ठानचा भाऊसाहेब पाटणकर पुरस्कार व श्यामची आई फाऊंडेशनचा पुरस्कारसुद्धा प्राप्त झाला आहे. 

   सुप्रिया जाधव यांची एक गझल रसिकांसाठी -   


जरा जखमेवरी ह्या घाल फुंकर... फार नाही !

तुझ्या-माझ्यात जे पडलेय अंतर... फार नाही


अबोल्यावर कशाला फोडणी ही टोमण्यांची ?

चिमुटभर पेर संवादात साखर... फार नाही !


तुझ्या चिंतेत ती गढली, अकाली पोक्त झाली

तिला बालीश म्हणणे हे तुझे वर...फार नाही ?


तुझ्या चांगुलपणाबद्दल नव्याने काय बोलू ?

मलाही दे जरासा वाटला तर...फार नाही !


कधी माहेर तर सासर, तुझी चालूच मरमर !

जगुन घे ना स्वतःसाठी घडीभर ... फार नाही !


(सुप्रिया मिलिंद जाधव)

........................

अमोल शिरसाट

अकोला

९०४९०११२३४


http://gazalyatra2020.blogspot.com/2021/04/blog-post_28.html

No comments:

Post a Comment