तीन गझला : आर.के. आठवले

१.

नात्यामधील दडपण आता नको मला 
माझी कुणास अडचण आता नको मला 

तलवार ठेवली मी बुद्धा तुझ्या पुढे
हे पाशवी रणांगण आता नको मला

जर लावला मुखवटा मन कोसते मला
माझ्या पुढ्यात दर्पण आता नको मला 

होणार चेहरा जर विद्रुप असा तुझा 
भाळावरील गोंदण आता नको मला

सेवा सुधारणांच्या थापा किती पुन्हा! 
नेत्या, जुनेच भाषण आता नको मला

ऐश्वर्य लाभले पण स्वातंत्र्य लोपले 
असले भयाण कोंदण आता नको मला

आयुष्य पेलताना जगणेच राहिले
अन् शेवटास वणवण आता नको मला

२.

समजू नकोस नेत्या सत्ता खिशात आहे
खुर्ची हिरावण्याची शक्ती मतात आहे

आवाज घुंगरांचा ऐकून बाळ निजले 
कळले असेल त्याला आई फडात आहे 

हाडांमधून विठ्ठल आवाज येत होता
चोखा अजूनही का मग पायऱ्यांत आहे 

कीर्तन करून सांगे पैशात राम नाही 
त्याची अता सुपारी लाखात जात आहे

एका तुझ्या मिठीने शिणभाग जात होता
गोडी कुठे तुझ्याविन आता जगात आहे!

हे ओठ चुंबल्यावर लक्षात एक आले
इतकी मधाळ गोडी कोठे मधात आहे!

व्यवहारशून्य वाटे माझी प्रिया जराशी
कित्येक चुंबनांच्या अजुनी ऋणात आहे

३.

लांडग्याचा जर सश्यासोबत घरोबा फार झाला 
संशयाने दाटते मन हा असा व्यवहार झाला

सिंह झाला जायबंदी भेकडांचे फावले मग
एक कोल्हा राजगादीवर हळू मग स्वार झाला


चार भिंती राहिल्या घर, त्याग तू केलास इतका
वादळाशी गाठ होती पण सुखी संसार झाला

टाळला संदर्भ माझा नेमक्या वेळेस मित्रा
तेवढ्याने काळजावर जीवघेणा वार झाला

चेहऱ्यावर कैक मुखडे लावलेले भेटल्यावर
जग खऱ्याचे राहिले ना, आज साक्षात्कार झाला
.................................
आर. के. आठवले
आनंद पार्क, भराडी रोड सिल्लोड ता. सिल्लोड
जि. औरंगाबाद 431112
9011895917

2 comments: