१.
घोषणांचे काय झाले सांगते नंतर
मागण्यांचे काय झाले सांगते नंतर
लाविला जेव्हा निशाणा सावजावर मी
सावजाचे काय झाले सांगते नंतर
बोलला स्वप्नात माझ्या खूप काही तो
भेटण्याचे काय झाले सांगते नंतर
हरविले ते बालपण तारूण्य आल्यावर
बाहुल्यांचे काय झाले सांगते नंतर
धूम त्याने ठोकली पाहून वाघाला
पाडसाचे काय झाले सांगते नंतर
धावला जेव्हा विठू हाकेस भक्तांच्या
देवळाचे काय झाले सांगते नंतर
काय देऊ मी उजाळा भूतकाळाला
हाल त्याचे काय झाले सांगते नंतर
२.
सारे मनाप्रमाणे ठरवू नकोस देवा
तू वाट मानवाची अडवू नकोस देवा
तू मोजके दिले रे आयुष्य मानवाला
ही चूक त्या यमाला कळवू नकोस देवा
जे राहतात हृदयी होऊन श्वास अपुले
आपापसात त्यांना लढवू नकोस देवा
शक्ती असेल ज्यांच्या बाहूत जिंकण्याची
त्यांना कधीच कोठे हरवू नकोस देवा
सत्कर्म जीवनी या करतात जे कुणीही
देऊन दुःख त्यांना रडवू नकोस देवा
निवडूंग जीवनाचा बहरून फार आला
काट्यास एवढेही जगवू नकोस देवा
दर्शन तुझे मलाही बस एकदा घडू दे
मागे तुझ्या तुझ्या मज पळवू नकोस देवा
३.
या जगाला जिंकण्याची जिद्द माझी
अंबराला भेदण्याची जिद्द माझी
नाव ज्याचे देव आहे या जगी हो
सत्य त्याचे शोधण्याची जिद्द माझी
फोडला नाही म्हणे पाझर कुणीही
त्या मनाला मोहण्याची जिद्द माझी
दूर गेले आपुले तर काय झाले
बंध सारे जोडण्याची जिद्द माझी
सोडले वा-यावरी ज्यांना जगाने
जीव त्यांना लावण्याची जिद्द माझी
बाळगू भीती कशाला मी कुणाची
संकटाशी खेळण्याची जिद्द माझी
झोपले आहेत जे घेऊन सोंगे
जाग त्यांना आणण्याची जिद्द माझी
.........................
निर्मला सोनी.
9765001266
चांदूर रेल्वे.
No comments:
Post a Comment