१.
तुझ्या मर्जीविना हलते कुणाचे पान या अल्ला
तुझी तारीफ मी करतो तुझे गुणगान या अल्ला
दयाळू तू,कृपाळू तू ,क्षमा करतोस आम्हाला
तुझे उपकार,तू देतो जगी सन्मान या अल्ला।
रुकू सजदा तुला करतो सलामी ही तुला देतो
तुझ्या वाचून कोठे ही न झुकते मान या अल्ला
मुहम्मद या रसूलुल्लाह तुझा सच्चा खरा बंदा
मुखी ज्यांच्या उतरले दिव्य ते कुराआन या अल्ला
तुझ्या भक्तांत कोणीही नसे छोटा तसे मोठा
तुझा सन्देश समतेचा ही अमुची शान या अल्ला
सदाचारा मिळे जन्नत मिळे दोजख दुराचारा
म्हणोनी ठेवतो आम्ही खऱ्याचे भान या अल्ला
तुझे हे चंद्र तारे,ही धरा अन् विश्व हे सारे;
तुझा साबिर तुझ्यावरती सदा कुर्बान या अल्ला।
२.
मोठमोठी नोकरी नाकारली मी
जिंदगी स्वप्नातली साकारली मी
बिनसुकाणू, बिनशिडाची नाव माझी
काय सांगू की कशी हाकारली मी?
रंग नाही, रूप नाही चेह-याला
मात्र ओळख आपली आकारली मी
चार वळवाच्या सरी येऊन गेल्या
चंद्रमौळी झोपडी शाकारली मी
तृप्त मी या शेतकी पेशात साबिर
कैक आयुष्ये उभी साकारली मी
३.
या वादळात ज्वाला अन धूर राहिलो
जो वाचल्या न गेला मजकूर रहिलो
अपमान सोसताना सन्मान राखला
सांगा कधी कुठे मी बेसूर राहिलो?
मृत्यूस भेटणारा काळोख दाटला
साऱ्या हयातस्थानी बेनूर राहिलो
काट्याकुट्यात जन्मे ही जिंदगी तरी
येथे फुलावयाला आतूर राहिलो
आजन्म स्वस्थतेची दीक्षा दिली तरी
अस्वस्थ अंतरी मी काहूर रहिलो
शौर्यास सैनिकांच्या करतो सलाम मी;
आतावरी स्वतःतच मी चूर रहिलो
आक्रोश वेदनांचे आकाश कोसळे
वाचावयास त्याला मजबूर राहिलो
श्वासापरी भुकेल्या देहात काळजी
आनंद सोहळ्याशी मगरूर राहिलो
'साबिर' तुझी परीक्षा या सांत्वनापुढे;
या रोजच्या व्यथांपुन का दूर राहिलो?
.................................
बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर सोलापुरी)
मस्त
ReplyDeleteधन्यवाद
Deleteतिन्ही गझला अगदी अप्रतिम सर! मनःपूर्वक अभिनंदन!
ReplyDeleteधन्यवाद
Delete