तीन गझला : मंगेश जनबंधू


१.

चालली ही अघोरी तुझी धावपळ 
जन्म करण्या बिलोरी तुझी धावपळ 

कापडाला कळू लागली वेदना 
वय लपवण्यास पोरी तुझी धावपळ 

का विखुरले अचानक तुझे बालपण
मांडण्या तू लगोरी तुझी धावपळ 

रात्र मिटते पहाटेस डोळे तिचे 
रांधते मग शिदोरी तुझी धावपळ 

घास भरवीत जाते सुखाने तुला 
नांदते पाठमोरी तुझी धावपळ 

पाहुनी वाट ती हो म्हणाली बरे 
काय राहील कोरी तुझी धावपळ !

२.

राहिले का नियंत्रण जिभेवर तुझे ?
बांधतो तू मनोरे हवेवर तुझे 

प्रेम नाही कुणाचे तुझ्यावर अता 
राहिले काय बाकी धरेवर तुझे 

आतल्या आत टाहो किती हुंदके 
आतला जाळ बघतो कलेवर तुझे 

ज्ञात नाही तुला जर तुझे नातलग 
पोर आहे कुणाच्या कडेवर तुझे 

आज निवडुंग झाल्या तुझ्याही व्यथा 
रोपटे वाढले ना विटेवर तुझे 

एकतर काम दे तू जिवाला तुझ्या 
हे नको सारखे कर कटेवर तुझे 

३.

ती मला भासते गूढ कादंबरी
पण लळा लावते गूढ कादंबरी

पाहते खोलवर एकटक आरसा
अन् म्हणे वाचते गूढ कादंबरी

पोचतो मी जवळ रोज मृत्यूघरी 
जीव ओवाळते गूढ कादंबरी

प्रश्न हे नेमके मी तिला चाळतो
की मला चाळते गूढ कादंबरी

काय आहे तिचे नाव सांगा मला
ती गझल सांगते गूढ कादंबरी

शब्द एकेक मी वेचतो वाचतो
मग नशा आणते गूढ कादंबरी 

No comments:

Post a Comment