तीन गझला : रामकृष्ण रोगे


१.

जखमा सुकल्यावर व्रण दावू 
हेच जन्मभर कारण दावू 

विचारले जर सौख्याबाबत 
दारावरचे तोरण दावू 

आतमधे तर मिळून राहू
फक्त वेगळे अंगण दावू

जमेल छानच नाटक अपुले 
धर्मांमध्ये भांडण दावू 

गाव पाहुनी झाल्यावरती 
साहेबांना पांदण दावू

द्रव्य पुरेसे जमले आहे 
खुशाल आता मी पण दावू 

लडिवाळपणे शिकून घेऊ
तोरा नंतर आपण दावू 

हवा कशाला महाल वेडे 
झोपडीतही घरपण दावू


२.

झाले पुरे कुणाचा आता लळा नको 
गोत्यात आणणारा गोतावळा नको 

पर्याय मांडले तू दोन्ही महान पण 
बगळा नको मला की तो कावळा नको

होऊन मीच सक्षम सांभाळतो मला 
खोटा तुझा उमाळा अन कळवळा नको 

दया दंड द्यायचा पण साधा सुधा नको 
मरणाहुनी निराळा अन वेगळा नको 

जीतेपणी जरासा संवाद साध रे 
प्रेतापुढे उगा तू काढू गळा नको 

मी जाणतो मला तू देणार काय ते 
दे आवळाच दे तू मज भोपळा नको 

३.

भिंतच देते थारा अफवेला 
पसरवतो मग वारा अफवेला 

अनभिज्ञ लोक पाजळतात इथे 
चिडीचुप पेरणारा अफवेला

अरेरे क्षीण होते आहे ती !
धावा...धावा...तारा अफवेला

एक सांग, ती तिन-तेरा करते
नको फापटपसारा अफवेला

असे कसे ते निष्कारण असते ?
खुशी मिळते?विचारा अफवेला 

नकाच घालू चारा अफवेला 
जागेवर फटकारा अफवेला


No comments:

Post a Comment