१.
तू पराचा कावळा केला
गोड कोठे मी गळा केला
एकसंघी भासतो म्हणुनी
विठ्ठलाला सावळा केला
खेचल्यावर पाय मृत्यूचा
श्वास माझा मोकळा केला
बरसला तो एवढा जणु की
या धरेने सोहळा केला
तू गतीने चालता हरदिन
पाय माझा पांगळा केला
विश्व सारे मज धुसर दिसले
एक डोळा आंधळा केला
२.
तू दिले मजला चुकांचे दाखले
मग चुकांना पांघरावे लागले
तृप्त व्हावा या धरेचा देह जणु
मी नभाला नख जरासे टोचले
गझलियत शेरात येण्या आगळी
दुःख माझ्या भोवताली ठेवले
संकटाचा पाहुनी तू पिंजरा
पंख का मग तू स्वतःचे छाटले
मी तसा लढणार होतो जीवना
पण जगाने कान माझे फुंकले
३.
काय करावे कसे करावे तुला कळे ना मला कळे
चंदनापरी सदा झिजावे तुला कळे ना मला कळे
भेटतेस तू जेव्हा मजला स्वतःभोवती घुटमळते
ताटकळत मी किती रहावे तुला कळे ना मला कळे
तोच रदिफ अन् तोच काफिया गझलेसाठी पुरे अता
गझलेमध्ये नवे सुचावे तुला कळे ना मला कळे
सकाळपासुन भांडत आहे कुणास ठावे कशास तू
भांडत भांडत कुणी थकावे तुला कळे ना मला कळे
केवळ नुसत्या सत्तेसाठी किती चालली लाचारी
खाल्लेले मग कसे पचावे तुला कळे ना मला कळे
ताणले की मग लगेच तुटते नात्यांमधला एकोपा
या नात्याला भार म्हणावे तुला कळे ना मला कळे
No comments:
Post a Comment