गझल : शिवाजी जवरे


कधीच डोळ्यामधून आणू नकोस धारा
मुकाट सोसून घे उरी आगडोंब सारा

खुली खुली एक वाट आहे तुझ्या घराची
दिशा दिशांनी किती करावा उगी पुकारा

झरेल अंबर, हसेल डोंगर, फुटेल पाझर
मला असा धीर देत गातोय रानवारा

तुम्ही नको ती जरी इथे खोडखाड केली
खतावणीतून आणला मी खरा उतारा

तुझ्या प्रितीतून ही कला साधली मला की
फुलापरी चुंबतो पुढे जो दिसे निखारा

दुखात अश्रू, सुखात धुंदी, कसा दिसावा-
अलिप्ततेने जगायचा तो तुझा इशारा

सदैव केली उभ्या जगाची हवालदारी
स्वत:वरी ठेवता न आला कधी पहारा

अखेरचा हा पडाव नाही मुसाफिरांनो-
कशास मी वाढवून घेऊ इथे पसारा

...................................
शिवाजी जवरे

1 comment:

  1. उभ्या जगाची हवालदारी फारच सुंदर .... !

    ReplyDelete