सामाजिक हतबलतेतून जगण्याचे भान देणारी अविनाशपासष्टी : दीपक करंदीकर


                     ज्येष्ठ समीक्षक कै. डॉ. द. भि. कुलकर्णी आपल्या समीक्षेत कविश्रेष्ठ सुरेश भटांना स्वतःचा संप्रदाय निर्माण करणारा कवी म्हणून मान्यता देताना दिसतात. आधुनिक मराठी कवितेत 'केशवसुत संप्रदाय' आणि 'मर्ढेकर संप्रदाय' आधीच निर्माण झाले होते; पण त्यांच्यानंतर फक्त आणि फक्त सुरेश भट या कवीनेच स्वतःच्या कविकर्तृत्वातून 'सुरेश भट संप्रदाय' निर्माण केला आहे, अशी पुष्टी डॉ. द. भि. कुलकर्णी याबाबत जोडतात.

                    सुरेश भट संप्रदायात साधारणत: १९७८ पासून त्यांच्या अनुयायांची भर पडत गेली. ती आजही थांबत नसल्याचे चित्र मराठी काव्यपटलावर दिसते. ह्या अनुयायांमध्ये साधारण १९८२ मध्ये निष्ठेने भटांना गुरुस्थानी मान देणाऱ्या एका ताज्या दमाच्या शिष्याची भर पडली. भट संप्रदायात स्वेच्छेने सामील होणाऱ्यात डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी पदार्पणातच जणू सिक्सर ठोकली. त्यांनी भटांच्या मार्गदर्शनात संशोधन करून 'मराठी गझल: १९२०-१९८५' हा डॉक्टरेट पदवीसाठीचा प्रबंध सिद्ध केला व मराठी गझलेवर 'डॉक्टरेट' मिळविणारा पहिला प्राध्यापक म्हणून कीर्ती संपादन केली. या कीर्तीत भर टाकणारी आणखी एक घटना डॉ. सांगोलेकर यांच्याबाबतीत घडली. ती म्हणजे स्वतः गझलसम्राट सुरेश भट यांनी संपादित केलेल्या 'काफला' ह्या पहिल्यावहिल्या मराठी प्रातिनिधिक गझलसंग्रहाचे 'सहसंपादक' होण्याचा मान डॉ. अविनाश सांगोलेकर यांना मिळाला. ह्या दोन्ही कामात डॉ. सांगोलेकर यांना सुरेश भटांचा प्रदीर्घ सहवास व मार्गदर्शन मिळाले व भटांच्या सान्निध्यात त्यांच्यातील 'गझलभाव' साहजिकपणे जागृत होऊ लागला. परिणामी भटांच्या संप्रदायातील इतर गझलकार शिष्यांच्याप्रमाणे डॉ. सांगोलेकरसुद्धा मराठी गझला लिहू लागले. हा काळ होता १९८२ ते १९९० चा. या काळात सांगोलेकरांच्या गझला संग्रहात समाविष्ट करण्याइतपत संख्येने निश्चितच तयार झालेल्या असल्या पाहिजेत; पण म्हणून डॉ. सांगोलेकरांनी आपल्या मराठी गझलांचा संग्रह प्रकाशित करण्याची अजिबात घाई केली नाही.
                चांगदेव जसा प्रदीर्घ आयुष्य लाभलेला ज्ञानेश्वरकालीन योगी होता, तसेच डॉ. सांगोलेकर हेसुद्धा विद्याभ्यासासाठी प्रदीर्घ वाट पाहणारे कविलेखक आहेत. आपल्या वयाच्या पासष्टीपर्यंत डॉ. सांगोलेकर थांबले व पुष्कळ विचारांती त्यांनी गुरुपश्चात जवळजवळ वीस वर्षांनी म्हणजे १५ जानेवारी २०२२ रोजी 'अविनाशपासष्टी' हा त्यांच्या  निवडक ६५ गझलांचा समावेश असलेला पहिलावहिला मराठी गझलसंग्रह प्रकाशित केला. ह्या संग्रहातील अनेक गझला दैनिके, साप्ताहिके, दिवाळी अंकांतून वेळोवेळी प्रकाशित झालेल्या आहेत. हे करत असताना 'पूर्णवेळ गझलकार' म्हणून करियर करण्याची त्यांना 'हाव' किंवा 'असोशी' नसल्याने ते भट - नाडकर्णीप्रणीत मराठी गझलचळवळीच्या काठाकाठावरूनच चालले. त्या प्रवाहात मनात आणलं असतं, तर आकंठ बुडवून घेऊन 'भट संप्रदायातील' पहिल्या फळीतील नामवंत शागीर्द म्हणून डॉ. सांगोलेकर यांनी नावही कमावले असते; पण ते स्वतः शिक्षकी पेशामुळे गझलवाचन, गझलचिंतन, गझलशिकवण ह्याच व्यापात आयुष्यभर गुंतले. ह्या सर्व त्यांच्या कृतीचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्यांच्या गझललेखनावर साहजिक परिणाम झालेला दिसतो. भट व नाडकर्णी आणि शागीर्दांची पहिली फळी साथ द्यायला असूनही गझलरचनेच्या सखोल समुद्रात हा गझलकार पोहला नाही, असे म्हणावे लागते. ह्या गोष्टीचे फायदे-तोटे यांचे परिणाम त्यांच्या गझलरचनांवर उमटलेले दिसतात. गझलचळवळीच्या

                    सेतुबंधनकामी हा 'पाषाण' कोरडा राहण्याची शक्यता निर्माण झाली असती; पण अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर डॉ. सांगोलेकरांनी गझलेच्या भाषेचे, गझलेच्या तंत्र-मंत्राचे, गझलेच्या सौंदर्याकर्षणाचे, गझलेच्या अंगभूत धीटपणाचे, गझलकार म्हणून आत्मचिंतनाचे, तसेच समाजचिंतनाचे शिंतोडे मात्र अंगावर मनमुराद उडवून घेतले आहेत. त्यामुळे त्यांच्या गझलेला इतर शागीर्दीप्रमाणे 'गुरुस्पर्श इस्लाह ट्रीटमेंट' फारशी झालेली दिसत नाही, तर स्वतंत्र, स्वानुभवउद्भवी, तंत्रशुद्ध, गझल त्यांच्याकडून लिहून झालेली दिसते

                गझलेच्या भाषेच्या दर्जाच्या संदर्भात म्हणूनच डॉ. सांगोलेकरांची गझल भट संप्रदायाहून थोडी वेगळी दिसते. मराठीत फारसी-उर्दू गझलेचा प्रवेश झाल्यापासून अशी गझल लिहिणे फार थोड्यांना जमले आहे, त्यात पासष्टीमुळे डॉ. अविनाश यांचे नाव अग्रभागी चमकेल, अशा ताकदीची संभावना निर्माण करणारा हा 'अविनाशपासष्टी' हा गझलसंग्रह झाला आहे, असे म्हणायला हरकत नाही.

               १९८० च्या दशकात मराठी कवितेत 'अतिरेकी' मुक्तछंदामुळे छंदोबद्ध रचना करू इच्छिणाऱ्या संभाव्य कवींमध्ये एक प्रकारची मरगळलेली, धास्तावलेली अवस्था निर्माण झाली होती; पण सुरेश भटांनी पुकारलेल्या 'एल्गार'मुळे निर्माण झालेल्या 'झंझावाता' मुळे ही मरगळ नाहीशी झाली, आकाशात उडून गेली. त्यातून छंदोबद्ध कविता लिहू इच्छिणाऱ्या कवींची लाट समाजात निर्माण झाली. त्यांना छंदांच्या शिस्तीतून किनाऱ्यावर आणण्याचे काम 'गझले'ने केले. अविनाशसारखे त्या काळातले कवी म्हणूनच ह्या झंझावाताकडे आकृष्ट झाले; पण अविनाश यांच्या हाती गझलसंशोधनाचे भरभक्कम शीड असल्याने ते ह्या झंझावातात स्वतंत्रपणे 'तग' देऊन उभे राहिले व वादळ थोडेसे शमल्यावर किनाऱ्याला अलगद लागले. ही त्याची भाषापद्धत स्वतंत्र त्याची होती. तो भाषेचा लहेजा तर भटप्रणीत निश्चितच नव्हता. तरुणपणाच्या वादळामुळे झालेल्या 'सुगंधी' जखमांची वीण त्यांनी तंत्रशुद्ध, पण समाजप्रेम / मानवतेबद्दलचा कळवळा यांच्या सुईधाग्याने विणण्याचा स्वतंत्र 'कुटिरोद्योग' केला. गुरुशरणता, तंत्रशणता यांची कांस न धरता त्यांनी हुशारीने 'संतुलनाची कांस' धरली. म्हणून त्यांची रचना वेगळ्या अंशावर वेगळ्या ध्रुवावर झुकलेली दिसते.

                   भटांच्या सान्निध्यात राहूनही म्हणूनच सांगोलेकर निसर्गप्रेम, प्रेयसी हितगुज, पत्नीप्रेम ह्या फंदात मुळीच पडले नाहीत. गझलेच्या फारसी - उर्दूप्रणीत मूळ व्याख्येला अनुसरून सांगोलेकरांनी प्रेयसीशी, निसर्गाशी किंवा पुढे जाऊन पत्नीशी हितगुज न करता आणि त्याही पुढे जाऊन स्वातंत्र्यदेवतेला प्रेयसी मानून तिच्याशी हितगुज वगैरे करण्यापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला व ह्या मूळ व्याख्येशी केव्हाच प्रतारणा करण्याचे धाडस केले. गझलविधा ( डॉ. राम पंडित यांच्या भाषेत) प्रवाह ह्याहीमुळे जिवंत राहिला आहे. गझलेच्या व्याख्या कालानुरूप बदलत गेल्या किंवा विस्तारत चाललेल्या आज दिसत आहेत, ते अशा वेगळ्या प्रयत्नाने !

                  सुरेश भटांनी माधव जूलियनांच्या कैक योजने पुढे जाऊन समाजातील तथाकथित संभावितांची पोलखोल केली व त्याच समाजातील तळागाळातील हीन दुःखितांची, दलितांची दु:खे, व्यथा, अन्याय, अत्याचाराला गझलेतून थेट वाचा फोडली. विचारांच्या ह्याच बेसलाईनवरून डॉ. सांगोलेकरांसारखे गझलकार -

किती पारखी नजर तयांची
ते बैलाला गाय म्हणाले

असे थेट निरीक्षण नोंदवू लागले.

                     १९९० च्या दशकापासून समाजातील अनेक चळवळी थंडावलेल्या दिसतात. अविनाश विचारतात- 

लढत का नाहीत आता माणसे ?
मारती का व्यर्थ बाता माणसे ? 

                        आजचा समाज प्रत्यक्ष कृतीपेक्षा बढाईखोरी करण्यात व्यग्र आहे, हेच समाजचिंतन त्यांनी अशा शेरातून 'पासष्टी' मध्ये मांडले आहे. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारा 'सोळभोग' (सुरेश भटांचा शब्द) बोका टपून बसला, त्याच्याकडे सांगोलेकर लक्ष वेधतात; पण दडपल्या गेलेल्या समाजाने आपली दु:खे, व्यथा मांडायची तरी कोणासमोर, असा प्रश्न त्यांना पडतो. तोच धागा पकडून निष्कर्ष काढतात की, पत्थरी, दगडी हृदयाचे विश्व चहूकडे पसरले असताना आम्ही आमचे अत्याचार कोणापुढे मांडावेत ? ह्या समाजात नीतिमूल्यांचा इतका चिखल झाला आहे की, नकलीच बाप आहे आणि फसवाच लेक (पुत्र) आहे. तिथे कोण कुणाला सुधारणार? ह्या प्रश्नावर  अविनाश नेमके बोट धाडसाने ठेवतो. म्हणूनच त्यांची रचना वेगळी ठरते.

                  एकीकडे ओसाड माळराने आणि दुसरीकडे  पिकांचे सोने असा परस्परविरोधी दृश्यांचा माणदेश गझलकाराला व्यथित करतो. पुरोगामी म्हणविणाऱ्या समाजातील दुभंगलेली एकात्मता, वाढतच चाललेले जातीजातीतील वैमनस्य, आरक्षणाची फुसकी पिपाणी, ही विदारक चित्रे गझलकाराला अस्वस्थ करतात. 'अति तेथे माती' हे तत्त्व आजच्या रोगजर्जर झालेल्या लोकशाहीला लागू पडते, असे ह्या राष्ट्रवादी गझलकाराच्या व्यथित मनाला वाटते. एकाच महापुरात सर्वच तत्त्ववादी, सत्यवादी वाहून गेले. समाज नेताविहीन 'गोंधळी' झाला. ह्या विचारप्रक्रियेत भविष्यातील गझलेत हा गझलकार नक्कीच प्रश्न विचारणार की 'अच्छे दिन' कुठे गेले? कधी येणार? अच्छे दिन येतयेत राहिले बाजूला आणि हा 'ड्यांबीस' करोना अवतरला आणि आम्हाला 'बुरे दिन' दाखवून गेला, त्याबद्दलही डॉ. सांगोलेकर 'पासष्टीत' भाष्य करतात. कवीने भूत, भविष्य, वर्तमान या तीनही घटितांना शब्दकवेत असेच पकडले पाहिजे. जीवनाचा संघर्ष करताना अर्ध्यावर आयुष्य झाल्याची जाणीव जेव्हा गझलकाराला होते, तेव्हा त्याच्या ओंजळीत फुलांच्याऐवजी काटेच आलेले दिसतात व युगानुयुगांच्या मानवी वंचनांपुढे हा गझलकारसुद्धा हतबल होतो. तरीही ज्योतिबा, आंबेडकर, गांधीरूपी दीपस्तंभ त्याला पुन्हा जगण्याचे भान व शक्ती देतात.

             'अविनाशपासष्टी'तून डॉ. अविनाशरूपी ज्ञानोबामाउली समाजरूपी योगी चांगदेवाला गुरुवर्य सुरेशच्याच प्रेरणाआज्ञेने पत्र पाठवतात. म्हणून ही गझल वेगळी! गझलेच्या तंत्रशुद्धतेनुसार 'अविनाशपासष्टी' मधील सर्व गझला तंत्रशुद्ध, वृत्तबद्ध आहेत. शिवाय शिक्षकी पेशाला अनुसरून डॉ. सांगोलेकरांनी प्रत्येक गझलेच्या तळाला त्या त्या गझलेचे वृत्तनाव, वृत्तप्रकार, मात्रासंख्या, आवर्तनक्रम ह्या वाचक व अभ्यासकाला उपयुक्त होतील, अशा तळटिपा दिल्या आहेत. तसेच प्रत्येक गझलेत 'अविनाश' ही तखल्लुस वापरली आहे, अशी दोन ठळक वैशिष्ट्ये ह्या गझलसंग्रहाची सांगता येतील.
('महाराष्ट्र साहित्यपत्रिका ', पुणे, जानेवारी ते मार्च २०२२ वरून साभार)

.................................
दीपक करंदीकर
भ्रमणध्वनी क्र : ९४२३००७०३५

गझलसंग्रहाचे नाव : 'अविनाशपासष्टी'
गझलकाराचे नाव : डॉ. अविनाश सांगोलेकर
प्रकाशनाचे नाव : ग्रंथाली, मुंबई .
पृष्ठसंख्या : ९६
मूल्य : १०० रुपये 

.

No comments:

Post a Comment