दोन गझला : शांताराम हिवराळे


१.

कधी तरी तू वाग असा की खर्‍यासारखा
नकोस बोचू कोणालाही खड्यासारखा

गर्व कशाला जिंदगी तुझी चार दिसांची
सदा रहा आतून असा तू गर्‍यासारखा

येऊ दे संकटे लाखभर डगमगू नको
नित्य रहा तू असा निरागस झर्‍यासारखा

दुनियादारी कशी असू दे खंत कशाला
वाग गड्या तू असा शेवटी भल्यासारखा

नकोस मोजू कधी चांदण्या नभातल्या तू
सदा जगाला वाटशील तू खुळ्यासारखा

तुफानातही मदतीला तू सज्ज असावे
वैर नसू दे नकोस वागू सुर्‍यासारखा

तीव्र उन्हाळा सभोवती बघ मृगजळ सारे
अशा प्रसंगी वाटावा तू तळ्यासारखा

२.

खर्‍याने वागतो येथे गुन्हा झाला
मुक्याने साहतो येथे गुन्हा झाला

कुणालाही लुटायाचे बरे नाही
भल्याने राहतो येथे गुन्हा झाला

गळेकापू पुढार्‍यांचे बरे आहे
किती मी राबतो येथे गुन्हा झाला

किती आश्वासने त्यांची भुलायाची
खरे मी बोलतो येथे गुन्हा झाला

दगा देऊन तू गेली कशासाठी
स्मृतींना टाळतो येथे गुन्हा झाला

उडायाचे कसे येथे दगा झाला
मला मी कोंडतो येथे गुन्हा झाला

मनाला डागण्या देणे नको आता
स्वत:शी झुंजतो येथे गुन्हा झाला

...............................
शांताराम हिवराळे
पिंपरी,पुणे
9922937339

2 comments: