१.
कुठल्याही साच्याचा दुनिये नको अता उपकार मला
भल्या बुऱ्या घावांनी शेवट दिलाय हा आकार मला
किती वाढवत नेले भांडण दोन्ही बाजूनी आपण
तुझ्यामुळे घेतली! घ्यायची नव्हती पण माघार मला
माहेरी आलेली मुलगी बापाला म्हणते आहे
नियम जरा बदलून दिलेला आवडला व्यापार मला
दिव्याखालच्या अंधाराला उजेड दाखवला कोणी
अता खायला उठेल नक्की माझा अंधःकार मला
पुन्हा उदासी घेउन आली नको अशा जागी आहे
किती जरी नाही म्हटले पण स्वतःस भेटवणार मला
२.
जगाला तर नव्या गोष्टी हव्या होत्या
कुणाला आपल्या गोष्टी हव्या होत्या?
पुढे पटलेच नाही फार दोघांचे
कदाचित वेगळ्या गोष्टी हव्या होत्या
पसारा वाढवत नेलाय आपण पण
मनाला तोकड्या गोष्टी हव्या होत्या
असे अडकून पडलो भूतकाळातच
जशा होत्या, तशा गोष्टी हव्या होत्या
म्हणे, रस्ता तुला चालून थकलेला
कशाला एवढ्या गोष्टी हव्या होत्या!
३.
घ्यायचे आहे वळण तर काहिसे थांबून घे
पावलांनी टाळलेले ऊन तर पाहून घे
आपले असणे असो वा आपले नसणे असो
फारसा नाही फरक पडणार हे समजून घे
जीव या कानांमधे पुरता उतरला पाहिजे
एकदा तू नाव माझे तेवढ्या आतून घे
आपल्यामध्ये उभा आहे कधीपासून जो
शक्यतो तू प्रश्न तो आतातरी बदलून घे
मूड हा पाहून मी पाऊस पाठवला तुला
आठवांच्या या सरी मध्ये जरा न्हाऊन घे
नीज या रात्री तरी यावी सुखाने एकदा
फक्त यासाठीच माझे चांदणे स्पर्शून घे
आणते नियती तिठ्यावर चालवत आधी मला
हात मग सोडून म्हणते तू तुझे पाहून घे
............................
श्रद्धा खानविलकर
तिन्ही गझला छान श्रद्धाजी. दुसर्या गझलेचा हटके रदीफ कमालच!
ReplyDelete- विजयानंद जोशी.